

8,184 criminals arrested in October, fine of Rs 38 lakhs collected
देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेने कडक कारवाई करताना ऑक्टोबर २०२५ महिन्यात ८,१८४ गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला आहे. दंड म्हणून गुन्हेगारांकडून ३८.०३ लाख रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी दिली.
महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास केल्याबद्दल २४३ जणांवर गुन्हा दाखल करत ६२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वे मालमत्तेची चोरी केल्याबद्दल ५९ जणांवर गुन्हा दाखल करत ४.६२ लाख रुपये दंडवसुली करण्यात आली.
तसेच प्रवाशांच्या सामानाची तपासणी करत सुमारे ८.२१ लाख रुपये किमतीचा दारू, गांजा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करत १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सामानाची चोरी आणि प्रवाशांना मारहाणीसारख्या गुन्ह्यांसाठी १६१ जणांना अटक करण्यात आली आहे.
याशिवाय रेल्वे आणि रेल्वे परिसरात प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आरपीएफने अनेक उपाययोजना केल्या आहेत. रेल्वे परिसरात आणि गाड्यांवरील हालचालींवर आरपीएफ व सीसीटीव्हीने देखरेख ठेवली जात आहे.
प्रवाशांची विशेषतः महिलांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांद्वारे वंदे भारत गाड्या, राजधानी एक्स्प्रेस गाड्या, मेल आणि एक्स्प्रेस गाड्या आणि उपनगरीय गाड्यांचे एस्कॉर्टिंग केले जाते.
मेरी सहेली पथक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, नाशिकरोड, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, दौंड, जळगाव, बडनेरा आणि नागपूर स्थानकांवर मेरी सहेली आरपीएफ पथके तैनात केली जातात. या स्थानकांवरून निघणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे निरीक्षण करता येईल.