

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत सुमारे ७५ हजार नवमतदारांची नोंदणी झाली आहे. मात्र नवमतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असताना, दावे - हरकती दाखल करणे आणि मतदारयादीतील नोंदींच्या पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत मात्र उदासीनता दिसून येत आहे. दावे हरकती दाखल करण्यासाठी सोमवार (दि. २६) पर्यंत मुदत असून, मतदान केंद्रांवरील विशेष शिबिरांचा रविवारी (दि. २५) शेवटचा दिवस आहे.
एसआयआर अंतर्गत प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे आणि हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाने दि. १२ ऑक्टोबर रोजी या प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती. त्यानुसार पात्र नागरिकांना सोमवारपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या उपस्थितीत विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
गेल्या आठवड्यातील दोनदिवसीय विशेष शिबिरांमध्ये सुमारे २,१०० नवमतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केले. दर आठवड्याच्या शिबिरांमध्येही साधारणपणे असाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. ऑनलाइन अर्जानाही चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ७५ हजार ६५६ नवमतदारांची नोंदणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मतदारयादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ६ भरता येतो. नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलांत दुरुस्ती करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ८ ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करता येणार आहे.
मतदारयादीतील नोंदींच्या पडताळणीसाठी नोटिसा मिळालेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बीएलओंकडून मदत केली जात आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. मात्र, नोटिसा मिळालेल्या नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
मतदान केंद्रावरील कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन
रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बीएलओंनी आपापल्या मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानंतर मतदान केंद्रांवर अशा प्रकारची विशेष शिबिरे आयोजित केली जाणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे नवमतदार नोंदणी, दावे- हरकती आणि नोटिसांवरील कागदपत्रांची पूर्तता प्रलंबित असलेल्या नागरिकांनी सोमवारच्या अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष येऊन आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.