नाशिक : पिंपळनेर पोलिसांचा कापूस चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग; अडथळ्यासाठी फेकल्या कापसाच्या गोण्या | पुढारी

नाशिक : पिंपळनेर पोलिसांचा कापूस चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग; अडथळ्यासाठी फेकल्या कापसाच्या गोण्या

पुढारी वृत्तसेवा; पिंपळनेर : साक्री तालुक्यातील कुडाशी येथे सिनेस्टाईल पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चकवा देत कापूस चोरांची टोळी पसार झाल्याची घटना आज (दि. १२) घडली. पिंपळनेर पोलिसांनी चोरट्यांनी रस्त्यावर फेकलेल्या कापूस भरलेल्या ५० गोण्या जप्त केल्या.

पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, पोकॉ पंकज वाघ हे रात्री गस्त घालत होते. या दरम्यान कुडाशी रस्त्यावर कापसाच्या गोण्या भरलेली विना नंबरची पिकअप वाहन वार्साकडून येत असल्याचे पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी हे वाहन थांबवण्याचा इशारा केला, मात्र संशयित वाहन चालकाने पोलिसांच्या वाहनाला हुलकावणी देत वाहन नवापूर रस्त्याने खोकसे गावाकडे पळविले. या वाहनाचा पोलिसांनी पाठलाग केला. या वाहनात मागच्या बाजूला कापूस भरलेल्या गोण्या दिसत होत्या. वाहनात तीन ते चार संशयित मागे बसलेले होते. हा माल चोरीचा असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी संबंधित वाहन चालकाला पीए सिस्टीमवरून थांबण्याचा इशारा दिला. परंतु वाहन चालकाने वाहनाचा वेग वाढवून खोकसा गावाकडून विसरवाडीकडे पळ काढण्याचा प्रयत्न सुरु केला. पोलिसांच्या वाहनाला अडथळा निर्माण व्हावा यासाठी कापसाच्या गोण्या फेकण्यासही सुरुवात केली. याचदरम्यान चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत विसरवाडीच्या दिशेने पसार झाले.

रस्त्यावर पडलेल्या एकूण लहान-मोठ्या 50 कापसाच्या गोण्या पोलिसांच्या हाती लागल्या. पोलिसांनी पंचनाम करून बेवारस मालमत्ता मुद्देमाल म्हणून त्या जप्त केला. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे चोरीचा माल घेऊन जाण्याचा चोरट्यांचा डाव फसला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे,पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित माळी,चालक पंकज वाघ यांनी केली आहे.

Back to top button