पीएम योजनेतून नाशिकला शंभर इलेक्ट्रिक बसेस; केंद्र शासनाची मंजुरी | पुढारी

पीएम योजनेतून नाशिकला शंभर इलेक्ट्रिक बसेस; केंद्र शासनाची मंजुरी

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : पीएम ई बस योजनेअंतर्गत केंद्र शासनाने नाशिक महापालिकेसाठी 100 इलेक्ट्रिक बसेसला अनुदान मंजूर केले आहे. यामुळे नाशिक मध्ये पर्यावरण पूरक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असून महापालिकेच्या सिटी लिंक बससेवेचा तोटाही डिझेल सीएनजी इंधनावरील बसेसच्या तुलनेत काही प्रमाणात कमी होणार आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी नाशिक महापालिकेने सर्व सेवा चालविण्याचा निर्णय घेतला असला तरी गेल्या सव्वा दोन वर्षापासून सुरू असलेली ही बस सेवा तोट्यात आहे. या बस सेवेमुळे सिटी लिंक ला तब्बल सव्वाशे कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. सिटीलींकच्या माध्यमातून शहरात 200 सीएनजी तर 50 डिझेल बसेस चालविल्या जात आहेत. या बसेसच्या संचालनासाठी सिटी लिंक ला प्रति किलोमीटर 75 रुपये दर मोजावे लागत आहे त्या तुलनेत उत्पन्न मात्र प्रति किलोमीटर 45 ते 50 रुपये इतकेच असल्यामुळे सिटी लिंक ला तोटा सहन करावा लागत आहे. सिटीलीचा तोटा महापालिकेच्या निधीतून भरून दिला जात आहे. हा तोटा कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस सहाय्यभूत ठरणार आहेत.

ग्रॉस टू कास्ट या तत्त्वावरच इलेक्ट्रिक बसेस धावणार असून थोडक्यात बसेस ठेकेदाराच्या असतील मात्र निविदा पद्धतीने संबंधित ठेकेदाराला प्रति किलोमीटरचे भाडे अदा केले जाईल. इलेक्ट्रिक बसेस खरेदीसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान ठेकेदाराला अदा केले जाईल. त्या मोबदल्यात महापालिकेला बस संचालनाच्या प्रति किलोमीटर दरात सवलत मिळेल. त्यातून डिझेल व सीएनजी बसेस च्या तुलनेत इलेक्ट्रिक बसेस चा प्रति किलोमीटर दर कमी होणार असल्याने सिटीलीकचा तोटा कमी होणार आहे.

महाराष्ट्रातील १४ शहरांमध्ये ई बस

महाराष्ट्रातील १४ शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावणार आहे. नाशिक बरोबरच नागपूर, छत्रपती संभाजी नगर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, वसई विरार,अमरावती ,भिवंडी, कोल्हापूर, मीरा-भाईंदर,सोलापूर, उल्हासनगर,अहमदनगर, लातूर ,या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत.

Back to top button