नाशिक : म्हाळदे येथील कारखान्यावर छापा; २ लाखांचा रंगयुक्त मसाला, मिरची पावडर जप्त | पुढारी

नाशिक : म्हाळदे येथील कारखान्यावर छापा; २ लाखांचा रंगयुक्त मसाला, मिरची पावडर जप्त

मालेगाव मध्य: पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभाग अ‍ॅक्शनमोडवर आले असून भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. मालेगाव शहरातील माळदे शिवारात असणार्‍या एका मसाले उत्पादन कारखान्यावर छापा टाकून सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचा रंगयुक्त मसाला व मिरची पावडर जप्त केली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत म्हाळदे शिवारातील प्लॉट नंबर 114 मधील सीमा मसाले प्रॉडक्ट येथे मिरची व मसाल्याचे उत्पादन सुरू होते. अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी छापा टाकून तपासणी केली असता त्याठिकाणी मिरची व मसाल्यामध्ये कायद्याप्रमाणे रंग वापरण्यास बंदी असूनही सिंथेटीक फुडो प्रिप्रेशन हा खाद्य रंग साठविलेला आढळून आला.

रंगाचा वापर अन्न व्यावसायिकाने टिक्का फ्रेश मसाला व मिरची पावडरमध्ये केला असल्याच्या संशय आहे. त्यामुळे 24 हजार रुपये किमतीचे 800 पॅकेट, कुठले ही लेबल नसलेली एक लाख 61 हजार 400 रुपये किमतीची 538 किलो मिरची पावडर तर 740 रुपये किमतीचा 8.5 किलो सिंथेटिक असा साठा भेसळीच्या संशयावर अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत जप्त करण्यात आला. या कारखान्यातून घेतलेले नमुने अन्न विश्‍लेषक यांना पाठविण्यात आले आहे. अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त संजय नारगुडे, सहायक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हेही वाचा 

Back to top button