नाशिक: खर्डे येथे शेतात बिबट्याचे बछडे आढळले | पुढारी

नाशिक: खर्डे येथे शेतात बिबट्याचे बछडे आढळले

देवळा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खर्डे येथे शनिवारी (दि ४ ) मक्याच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले. शेतकऱ्यांनी याची वनविभागाला कल्पना दिल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या खर्डे, वाजगाव परिसरात मका कापणीचे काम सुरू आहे. मक्याच्या शेतात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने घबराटीचे वातावरणात निर्माण झाले आहे. वन विभागाने याची तत्काळ दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा बसवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

खर्डे (ता. देवळा) येथील खर्डे वाजगाव शिवबांध येथील शेतकरी बंडू देवरे यांच्या शेतात शनिवारी मजूर मका कापणी करत होते. यावेळी त्यांना बिबट्याची दोन बछडे आढळून आली. यावरून याठिकाणी मादी असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. यावेळी नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा बसविण्याची मागणी केली. खर्डे व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

खर्डे परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने नदी नाले, छोटे मोठे पाझर तलाव, कोरडेठाक पडले आहेत. तर विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. बिबटे पाण्याच्या शोधात याठिकाणी फिरत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शेतात राहणाऱ्या शेतकरी व पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button