नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण विरोधी रावणाचे दहन | पुढारी

नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण विरोधी रावणाचे दहन

येवला; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्नी गेल्या ३७ दिवसांपासून ठिय्या आंदोलनास बसलेल्या व गेल्या आठ दिवसापासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलेल्या सकल मराठा समाज युवकांनी आज येवला तहसील कार्यालयाच्या आवारात मराठा आरक्षण विरोधी रावणाचे दहन केले.

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबासह विविध स्थानिक मागण्यांसाठी येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे अन्न त्यागाचा आज नववा दिवस असून या आंदोलन स्थळी हे आंदोलन करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी मध्ये समाविष्ट करून दाखले द्यावेत, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. शासन आरक्षणाचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. तालुका दुष्काळी जाहीर करावा, पुणे गाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे रुंदीकरण करून बंधारे आरक्षित करावेत, येथील शिवसृष्टीचे काम पूर्ण करावे, राजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पूर्ववत बसवावा, टोल नाक्यावरील आंदोलन शेतकऱ्यांची गुन्हे मागे घ्यावे, चिचोंडी येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी, भुयारी गटार योजनेचे काम सुरू करावे, आदी स्थानिक मागण्या देखील त्यांनी केल्या आहेत.

यावेळी किशोर सोनवणे, संदीप बरशिले, गोरख कोटमे, शिवलाल धनवटे, कैलास साबळे, किरण कोल्हे, राजेंद्र मेंढकर, गणेश मेंढकर, पुरुषोत्तम रहाणे, शरद राऊळ, माधव जाधव, बाळासाहेब देशमुख, विष्णू कव्हात, गोरख सांबरे, रुपेश शेळके, किशोर कोंढरे, प्रविण शेळके, समाधान शेळके, महेश शेळके, राहुल शेळके, शुभम सोनवणे व अन्नत्याग आंदोलन करणारे सर्व आंदोलक उपस्थित होते.

Back to top button