काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेमुळे विरोधक हादरले : आमदार कुणाल पाटील

धुळे; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा आणि देशाचे नेते खा.राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे विरोधक हादरले आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद पहाता देशात आणि राज्यात परिर्वतन अटळ असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी शिंदखेडा येथे झालेल्या जाहिर सभेत व्यक्त केला.
साळवे-चिमठाणे येथील क्रांतीस्मारकापासून प्रारंभ झालेल्या जनसंवाद पदयात्रेचे शिंदखेडा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे औक्षण करीत गावागावात स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान पदयात्रेत आ.कुणाल पाटील आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधल्याने दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना आधार मिळाला.
देशात आणि राज्यात सरकारच्या दडपशाहीमुळे भितीचे वातावरण पसरले आहे. वाढती महागाई, महिलांवर होणारे अत्याचार, शेतीमालाला भाव नाही, जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणे, तसेच विरोधकांचा आवाज दाबून लोकशाही संविधान संपविण्याचे कट कारस्थान यामुळे जनतेच्या मनात प्रचंड चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे जनभावना जाणून घेतांना जनतेच्या मनातील भिती दूर व्हावी म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे व देशाचे नेते खासदार राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा सुरु झाली आहे. धुळे जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सुरु झाली आहे. साळवे-चिमठाणे ता.शिंदखेडा येथील क्रांती स्मारकाला अभिवादन करुन पदयात्रेला सुरुवात झाली. ही पदयात्रा शिंदखेडा तालुक्यातील साळवे, हतनूर, भडणे, परसामळ या गावावरुन शिंदखेडा शहरातील विविध कॉलन्या व वसाहती,चौकातून निघाली. त्यानंतर चिरणे,कदाणे,बाभूळदे, महाळपूर, निशानेमार्गे खलाणे येथे पोहचली. खलाणे येथे काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत जाहिर सभा झाली. दरम्यान दुपारी शिंदखेडा येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाजवळील सभागृहात झालेल्या जाहिर सभेत बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि,देशाचे नेते खा.राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रा आणि आताच्या पदयात्रेमुळे विरोधक हादरले आहेत. काँग्रेसचा कार्यकर्ता सर्वसामान्यच्या सुखदुखात सामील होत असतो. त्यांचे दुख,भावना जाणून घेतो. आणि जनतेच्या प्रोत्साहनामुुळेच पदयात्रेत नवी उर्जा मिळत असते असे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी मार्गदर्शन केले.
शेतकरी दुष्काळाने हवालदिल
जनसंवाद पदयात्रेदरम्यान आ.कुणाल पाटील आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी व शेतमजूरांशी संवाद साधला. शेतकर्यांशी संवाद साधत असतांना शेतकर्यांनी दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली तसेच कर्जमाफ करण्यात यावे अशाही मागण्या केल्या. आ.पाटील यांनी जनसंवाद यात्रेत साधलेल्या संवादामुळे दुष्काळाच्या संकटात जनसंवाद यात्रेमुळे शेतकर्यांना आधार मिळाला.
जनसंवाद पदयात्रेत आ.कुणाल पाटील यांच्यासोबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, ज्येष्ठ नेते सुरेश देसले, विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी, माजी नगरसेवक दिपक अहिरे, दिपक देसले,ज्येष्ठ नेते प्रफ्फूल सिसोदे, धुळे बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, शिंदखेडा तालुका महिला कॉग्रेस अध्यक्षा छायाताई पवार, शामकांत पाटील,पं.स.सदस्य राजेंद्र देवरे, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील,इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोदे सिसोदे यांच्यासह शिंदेखडा तालुक्यातील विविध गावातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.