

नाशिक : सणासुदीत विशेषतः दिवाळीत नफेखोरी करण्यासाठी सर्रासपणे भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर यंदा अन्न प्रशासनाने करडी नजर होती. परिणामी, अवघ्या दोनच दिवसांत राज्यातील तब्बल ४३ हॉटेलांचे अन्न परवाने रद्द करीत प्रशासनाने धडक कारवाई केल्याने, दिवाळीत भेसळ करण्याचे मनसुबे असलेल्या भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. नागपूर विभागात सर्वाधिक अन्न परवाने रद्द करण्यात आले असून, पाठोपाठ नाशिक विभागात कारवाया करण्यात आल्या आहेत.
गेल्या ६ व ७ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष मोहीम राबविली. यात भेसळीसह अस्वच्छतेत अन्नपदार्थांची निर्मिती करणे, नियमांचे पालन न करणे आदी बाबींची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत तब्बल ४३ आस्थापनांनी नियमांचे उल्लंघन केलेच, शिवाय स्वच्छतेचे निकष न पाळल्याने, तसेच काही बहाद्दरांनी भेसळयुक्त पदार्थ विक्रीस आणल्याने त्यांचे अन्न परवाने रद्द करण्याची धडक कारवाई केली गेली. नागपूर विभागात या दोन दिवसांत सर्वाधिक १८ आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले. तर पाठोपाठ नाशिक विभागात तब्बल नऊ आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवायांमुळे दिवाळीत अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून आले. विशेषतः मिठाई विक्रेत्यांमध्ये प्रशासनाची चांगलीच धास्ती दिसून आली. विक्रेत्यांनी अन्नपदार्थांचा दर्जा राखण्याबरोबरच स्वच्छतेचे निकष पाळण्यावर भर दिला. दरम्यान, प्रशासनाच्या या कारवायांचे नागरिकांनी स्वागत केले असून, पुढील काळातदेखील अशा प्रकारच्या धडक कारवायांची प्रशासनाकडून अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केली जात आहे
प्रशासनाकडून इशारा
अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांनी नागरिकांच्या जीविताशी खेळू नये. ताजे अन्नपदार्थ ठेवण्याबरोबरच स्वच्छतेबाबतचे सर्व निकष पाळण्यास, विक्रेत्यांनी प्राधान्य द्यावे. अन्न प्रशासना-कडून पुढील काळातदेखील कारवाया सुरूच ठेवल्या जाणार असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर परवाना निलंबनाच्या कारवाईसह दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.