

नाशिक : 'आफ्रिकन स्वाइन फीवर'च्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने शहर, परिसरात केलेल्या सर्वेक्षणात २२ वराहपालक तसेच मांसविक्रेत्यांकडे तब्बल ३८७ वराह आढळले आहेत. महापालिकेने या सर्व वराहपालक तसेच मांसविक्रेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधितांना आफ्रिकन स्वाइन फीवरची माहिती देत लक्षणे आढळल्यास तातडीने महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेच्या खत प्रकल्प परिसरालगतच्या शरण ॲनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वराहांचा मृत्यू आफ्रिकन स्वाइन फीवरमुळे झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने शरण ॲनिमल रेस्क्यू सेंटर सील करत एक किलोमीटर परिसर प्रतिबंधित घोषित केला आहे. त्याचप्रमाणे शनिवार (दि. २२) पासून बाधित क्षेत्राच्या १० किलोमीटर परिसरातील वराह फार्मची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिले होते.
हे क्षेत्र महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने स्वतंत्र पथकांमार्फत शहरातील सहाही विभागांत सर्वेक्षण केले. यात शहरामध्ये तब्बल २२ वराहपालक, मांसविक्रेत्यांकडे ३८७ वराह असल्याचे आढळले आहे. हे वराह आजारी नसल्याचे प्रथमदर्शनी आढळले असले, तरी सर्व वराहपालक तसेच मांसविक्रेत्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, आफ्रिकन स्वाइन फीवरची माहिती देण्यात आली आहे. वराहांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून आल्यास तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन या वराहपालक, मांसविक्रेत्यांना करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अजित निकत यांनी दिली.