

35 cages for leopards, thirteen captured in a month, time for the forest department to rush
देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा दारणा, गोदावरी, वालदेवी या तिन्ही नद्यांच्या किनाऱ्यालगत दाट झाडी, उसाचे क्षेत्र व जंगलामध्ये संपलेले खाद्य यामुळे बिबट्यांचा वावर ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त वाढल्याने अनेक ठिकाणी हल्ले वाढले आहेत. याची दखल घेत वन विभागाने तालुक्यात ३५ पिंजरे उभे केले आहेत. गेल्या महिन्याभरात १३ बिबटे ठिकठिकाणी जेरबंद करण्यात आले असले तरी अद्यापही या तालुक्यातील नागरिकांचे भय दूर झालेले नाही.
वडनेर दुमाला येथे दोन लहान मुलांचा बळी गेलेल्या घटनेनंतर बिबट्याविषयी रहिवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे. तरी केंद्रीय वन्यजीव कायद्यान्वये बिबट्यांना मारण्याऐवजी पकडणे हाच उपाय कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी नियमानुसार बिबटे जेरबंद करण्यावर भर देत आहेत.
दारणा काठच्या पट्टयातील राहुरी, दोनवाडे, भगूर, विंचूरदळवी, लहवीत, वंजारवाडी, लोहशिंगवे, नानेगाव, शेवगेदारणा, पळसे, मोहगाव, बाबळेश्वर, जाखोरी, हिंगणवेढे या गावांमध्ये सातत्याने बिबट्याचे अस्तित्व दिसून आलेले आहे. त्यांनी पाळीव प्राण्यांना भक्ष्य केलेले आहे. याशिवाय वडनेर दुमाला, देवळाली कॅम्प, साउथ देवळाली, विजयनगर, सौभाग्यनगर, जयभवानी रोड या शहरी भागातही बिबट्याचे अस्तित्व आहे. या ठिकाणी सायंकाळनंतर सोसायटी परिसरातील नागरिक आपल्या लहान मुलांना बाहेर एकटे सोडण्यास धजावत नाहीत.
आता हिवाळ्याला प्रारंभ झाला असून, सहाच्या सुमारास अंधार पडत आहे. त्यामुळे रहिवाशांची धाकधूक अधिकच वाढत आहे. कुत्रे, कोंबड्या, बकरे, वासरे ही त्याची खाद्य ठरलेली असून, एखादा बिबट्या नरभक्षक झाल्यास तो लहान बालकांवर हल्ला करीत आहे. साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू होत असल्याने ऊस तोडणीसही सुरुवात होत आहे. त्यामुळे उसात वास्तव्यास असलेले बिबटे आता सैरभैर होणार आहेत. परिणामी बिबटे थेट शहराकडे येत पाळीव प्राण्यांवर हमखास हल्ले करण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्याभरात तालुक्यातील वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, पाथर्डी, लोहशिंगवे, लहवित, ओढा, शिलापूर, बेलतगव्हाण, नानेगाव या भागांत १३ बिबटे जेरबंद करण्यात आलेले आहेत.