

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रस्ते विकासाच्या कामांना गती दिली आहे. द्वारका सर्कल परिसरातील संभाव्य वाहतूक कोंडी कमी करण्यासह साधूग्रामकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी जनार्दनस्वामी मठ (छत्रपती संभाजीनगर रोड) ते लक्ष्मीनारायण मंदिर पूलमार्गे ड्रीमसिटी चौकापर्यंतचा ३० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.
या कामासाठी ३२ कोटी ५३ लाख ८४ हजार ३० रुपयांचा प्रस्ताव गुरुवारी (दि. २२) होणाऱ्या स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. विकास आराखड्यात ३० मीटर रुंदीचा प्रस्तावित असलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० अर्थात नाशिक-पुणे रोड आणि छत्रपती संभाजीनगर रोड यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना साधूग्राम, लक्ष्मीनारायण घाट, कपिला संगम घाट, तपोवन, रामसृष्टी तसेच शाही मार्गाकडे जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणार आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने पोलिस आयुक्त कार्यालयाने सुचवलेल्या प्राधान्यक्रमाच्या यादीत या रस्त्याचा 'अ' प्राधान्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचा खर्च शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानातून भागविण्याचे नियोजन आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर रस्त्याच्या विकासकामाला पुढील प्रक्रिया पूर्ण करून गती मिळण्याची अपेक्षा आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची वाढणारी गर्दी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता, हा मार्ग शहरातील वाहतूक व्यवस्थासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या रस्त्याच्या विकासकामासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरगाने ३६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानुसार महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जीएसटी आणि अन्य शुल्कांसह ३५ कोटी ९९ लाख ९६ हजार ३५० रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते.
कामासाठी राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेत एकूण ११ निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी सहा निविदा पात्र ठरल्या. त्यात मे. बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांची १०.१० टक्के दराची निविदा अंतिम ठरली आहे.
ठेकेदाराने सादर केलेल्या दरानुसार प्रत्यक्ष कामासाठी २६ कोटी १० लाख ८८ हजार ७४ रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यावर जीएसटी, रॉयल्टी व टेस्टिंग शुल्क आणि आकस्मिक खर्च (कॉन्टिन्जन्सी) या सर्व बाबींची मिळून रक्कम ३१ कोटी ७४ लाख ८८ हजार ५०३ रुपये होते.
शिवाय ७८ लाख ९५ हजार ५२७ रुपये वास्तुविशारद शुल्क समाविष्ट केल्यानंतर संपूर्ण प्रकल्पाचा अपेक्षित खर्च ३२ कोटी ५३ लाख ८४ हजार ३० रुपये इतका होणार आहे. या खर्चास तसेच संबंधित ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीची प्रशासकीय व वित्तीय मान्यता मागण्यात आली आहे.