
देवळाली कॅम्प: पावसाळी अधिवेशनात आमदार सरोज अहिरे यांनी देवळाली मतदारसंघासाठी जोरदार पाठपुरावा करत सुमारे 275 कोटीच्या विकासकामांना मंजुरी मिळवली आहे. त्यात प्रामुख्याने 174 कोटी रुपये रस्त्यांसाठी तर 51 कोटी रुपये ग्रामीण रुग्णालयासाठी मंजूर झाल्याने बऱ्याच वर्षाची मागणी मान्य झाली आहे
पावसाळी अधिवेशनात आ. अहिरे यांनी दहावा मैल सिद्धपिंपरी- लाखलगांव-हिंगणवेढे-कोटमगांव-जाखोरी-चांदगिरी-शिंदे या रस्त्यासाठी सर्वाधिक 174 कोटींचा निधी पदरात पाडून घेतला आहे. सोबतच शिंदे ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी 35 कोटी व गिरणारे उपजिल्हा रुग्णालय व सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १६ कोटींच्या निधीचा समावेश आहे.
देवळाली मतदारसंघात गेल्या चाळीस वर्षापासून महत्वाची विकास कामे प्रलंबित होती. मंजूर कामांमुळे मतदारसंघातील हजारो नागरिकांची दळणवळणाची सोय तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न निकाली निघाल्याने आरोग्यासारखा महत्वाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. शिवाय नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघात टी-6 योजनेंतर्गत आदिवासी भागातील रस्त्यांसाठी 26 कोटी मंजुर झाले असल्याने आदिवासी बांधवांच्या वाडया वस्तीवर दळणवळणाची सोय होणार आहे. देवरगांव येथील आदिवासी आश्रम शाळेतील मुलांच्या वसतीगृहासाठी 14 कोटी रुपये मंजूर झाले असून आदिवासी मुलांसाठी निवाऱ्याची कायमची सोय होणार आहे. याशिवाय रस्ते सुधार योजनेअंतर्गत 10 कोटींची मंजुरी मिळाली आहे.
दहावा मैल सिद्धपिंपरी-लाखलगांव-हिंगणवेढे-कोटमगांव-जाखोरी-चांदगिरी- शिंदे येथील राज्य महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम होणार असल्याने यामुळे हजारो नागरिकांची कनेक्टीविटी जलद होऊन सुलभ होणार आहे. या भागातील शेेतकरी, कामगार, मजूर, विद्यार्थी व नोकरदार या घटकांसाठी हा रस्ता खूपच फायद्याचा ठरणार आहे.
शिंदे व गिरणारेतील रुग्णालयाच्या इमारतीसाठी आ. आहिरेंनी गेल्या अधिवेशनात मागणी करुन निधीची मागणी केली होती. शासनाने याची दखल घेत शिंदे येथील ग्रामीण रुग्णालयासाठी 35 कोटी व गिरणारे येथील पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी 16 कोटी असे एकुण 51 कोटींचा निधी या दोन्ही रुग्णालय इमारतींना उपलब्ध करुन दिला आहे. शिंदे व गिरणारे या भागातील आदिवासी बांधवांना आरोग्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक महत्वाची कामे मार्गी लागल्याने नागरिकांनी चांगल्या सुविधा मिळणार आहे. अनेक महत्वाची कामे मार्गी लागल्याने आनंद होत आहे.
आ. सरोज आहिरे, देवळाली मतदारसंघ, नाशिक.