

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना आपापल्या मतदारसंघातील पाच महत्त्वाची कामे हाती घेण्याचे जाहीर केल्यानंतर नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी अंबड-सातपूर लिंक रोडवरील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या सोडवण्यासाठी गरवारे ते सातपूर पपया नर्सरीपर्यंत 13 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव सादर केला आहे.
अंबड-सातपूर लिंक रोडवरील वाढत्या वाहतुकीची समस्या लक्षात घेता भविष्यात हा उड्डाणपूल प्रत्यक्षात आल्यास या भागातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. या संदर्भात ‘दैनिक पुढारी’त वाहतुकीच्या समस्येवर वृत्त प्रसिद्ध झाले होते. औद्योगिक क्षेत्राला या प्रकल्पामुळे मोठा फायदा होणार आहे. वेळेची बचत होईल आणि उत्पादकतेत वाढ होऊ शकतेे.
शहरातून जाणार्या मुंबई-आग्रा महामार्गावर आणि औद्योगिक वसाहतींकडे जाणार्या मार्गांवर सध्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींच्या परिसरातून जाणार्या मार्गांवर अवजड वाहनांची वर्दळ जास्त असल्याने वेळ वाया जातो. प्रस्तावित 13 किलोमीटरचा हा उड्डाणपूल झाल्यास मुंबईकडून सातपूर औद्योगिक वसाहतीकडे जाणारे ट्रक आणि कंटेनर तसेच त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहने थेट उड्डाणपुलावरून जाऊ शकतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना आपापल्या मतदारसंघातील पाच महत्त्वाची कामे हाती घेण्याचे जाहीर केल्यानंतर मी प्रथम अंबड- सातपूर लिंक रोडवरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी गरवारे ते सातपूर पपया नर्सरीपर्यंत 13 किलोमीटर उड्डाणपुलाचा प्रस्ताव सादर केला आहे.
सीमा हिरे, आमदार
गरवारे ते सातपूर पपया नर्सरीपर्यंत उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव आमदार सीमा हिरे यांनी दिला आहे. उद्योजक व कामगारांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.
ललित बूब, अध्यक्ष, आयमा
उड्डाणपूल झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
राजेंद्र पानसरे, उपाध्यक्ष, आयमा
भविष्यात उड्डाणपूल होऊन अंबड व सातपूर औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. -
ज्योती कवर, भाजप महिला आघाडी
अंबड-सातपूर लिंक रोडवर गरवारे ते सातपूर पपया नर्सरीपर्यंत उड्डाणपूल झाल्यास दळणवळण व्यवस्थेत क्रांती घडेल.
तुषार चव्हाण, उद्योजक
उड्डाणपूल झाल्यास नागरिक व महिलांना रस्त्यावरून जाताना अपघात होण्याची शक्यता कमी राहील.
बाळासाहेब ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते, जाधव संकुल
अंबड-सातपूर लिंक रोड उड्डाणपूल होणे गरजेचे होते. या रस्त्यावर उड्डाणपूल झाल्यास अपघात कमी होतील.
आशिष नहार, अध्यक्ष, निमा