नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागात नाशिक जिल्ह्याचीच सरशी दिसून आली आहे. विभागाचा निकाल 91.31 टक्के तर नाशिक जिल्ह्याचा निकाल 95.61 इतका लागला आहे. परीक्षेत मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण यंदाही मुलांपेक्षा अधिक आहे.
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांतून एकूण 1 लाख 58 हजार 593 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 57 हजार 842 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यापैकी 1 लाख 44 हजार 136 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा निकाल 91.31 टक्के इतका लागला आहे. नाशिक विभागात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 93.51 टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 89.44 टक्के इतके आहे.
विभागात नाशिक जिल्हा अव्वल ठरला असून, जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 95.61 टक्के लागला. दुसर्या नंबरवर जळगाव जिल्हा असून, निकाल 94.54 टक्के तर नंदुरबारचा 86.82 टक्के लागला आहे. धुळे जिल्हा चार नंबरवर असून, धुळ्याचा निकाल 84.88 टक्के लागला आहे. मागील चार वर्षांची तुलना करता नाशिक विभागाची टक्केवारी वाढलेली आहे. 2022 मध्ये नाशिक विभागाच्या निकालाची टक्केवारी 94.35, 2023 मध्ये 91.66 टक्के, 2024 मध्ये 94.71 टक्के तर 2025 मध्ये 95.61 टक्के इतकी आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत एकूण १२ गैरप्रकार आढळून आले. मंडळ शिक्षा सूचीनुसार त्याची शास्ती करण्यात आली आहे. विभागात मार्च 2023 मध्ये 73, मार्च 2024 मध्ये 52 तर मार्च 2025 मध्ये 12 गैरप्रकार आढळून आले.
ऑनलाइन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रती या दोन्हींसाठी मंगळवार 6 ते 20 मेपर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतील, अशी माहिती नाशिक विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे व विभागीय सचिव एम. एस. देसले यांनी दिली आहे.