

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) च्या परिक्षेत नाशिक विभागात नाशिक जिल्ह्याने 95.38 टक्के मिळवून बाजी मारली. जळगाव जिल्ह्याने 93.97 टक्के मिळवून दुसर्या क्रमांक, नंदुरबारने 88.19 टक्के मिळवून तिसरा क्रमांक तर 87.10 टक्के मिळवून धुळे जिल्ह्याने चौथा क्रमांक मिळविला.
दहावीच्या बोर्ड परिक्षेत नाशिक विभागातून एकूण 1 लाख 98 हजार 707 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यातील 1 लाख 97 हजार 17 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले. नाशिक जिल्ह्यातून 91 हजार 895, जळगाव जिल्ह्यातून 56 हजार 236, नंदुरबार जिल्ह्यातून 20 हजार 847 तर धुळ्यातून 28 हजार 36 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये नाशिकमधून 87 हजार 653, जळगावमधून 52 हजार 846, नंदुरबारमधून 18 हजार 386 तर धुळ्यामधून 24 हजार 420 विद्यार्थी पास झाले.
यंदा परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मंडळाने कसुन तयारी केली होती. 20 जानेवारी ते 26 जानेवारीदरम्यान मुख्यमंत्र्यांपासून विभागीय अधिकार्यांपर्यंत सर्वांनीच कॉपीमुक्त अभियानासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली. नियम आणि सुचनाही मोठ्या प्रमाणावर लागु केल्या होत्या. यामुळे विभागात यंदा तुरळक प्रकार वगळता कुठेही मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार आढळून आले नाही. विभागात मार्च 22 मध्ये 69 तर मार्च 23 मध्ये 70 कॉपीचे प्रकार आढळले होते. यंदा जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली असल्याने मागील वर्षीप्रमाणे यंदाही कॉपीचे कुठलेच प्रकार घडले नसल्याने मंडळाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवारपासून (दि.14) बुधवार (दि.28) पर्यंत ऑनलाईनपध्दतीने अर्ज करता येणार आहे. याचसोबत ऑनलाईन शुल्क डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, युपीआय किंवा नेट बँकींगमार्फत भरता येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी देवळा तालुक्याने 98.26 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याखालोखाल सुरगाण्याने 97.28 ट़क्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळविला आहे तर नाशिक महापालिका क्षेत्राने 97.14 गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे. मालेगाव महापालिका क्षेत्र 90.97 टक्के गुण मिळवून सतराव्या क्रमांकावर आहे. नाशिक तालुका 94.55 टक्के गुण मिळवून सतराव्या क्रमांकावर आहे.