नाशिक | जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्क्यात घसघसशीत वाढ झाली आहे. मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात ६९.१२ टक्के मतदान नोंदविले गेले. २०१९ च्या तुलनेत यंदा ६.५२ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. जिल्ह्यात निफाडवगळता उर्वरित १४ ही मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला आहे. मतांचे धुव्रीकरण तसेच महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मतांच्या टक्केवारीत वाढल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील विधानसभेच्या पंधरा जागांसाठी बुधवारी (दि.२०) शांततेत मतदान पार पडले. यावेळी एकूण ५० लाख ६१ हजार १८५ मतदारांपैकी ३४ लाख ९८ हजार २५८ मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात ६२.६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा आकडा ६९.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यात कळवण मतदारसंघात सर्वाधिक 78.43 टक्के मतदान नोंदविण्यात आले. तर मतदान टक्केवारीच्या यादीत नाशिक पश्चिम तळाला असून, मतदारसंघात अवघे 56.71 टक्के इतके मतदान झाले. पण, २०१९ शी तुलना केल्यास यंदा पश्चिमला २.३७ टक्के मतदान वाढले आहे.
जिल्ह्यात यंंदा शहरी भागापेक्षा ग्रामीणमध्ये मतदारांचा उत्साह अधिक असल्याचे दिसून येत आहे. कळवणसह तब्बल सात मतदारसंघांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. त्या तुलनेत नाशिक शहरातील चारही मतदारसंघात ५५ ते ६० टक्यांदरम्यान, मतदान नोंदणी झाली असली तरी गेल्यावेळच्या तुलनेत यंदा चांगली वाढ आहे.
२०१९ च्या मतदान टक्केवारीशी तुलना केल्यास इगतपुरीत सर्वाधिक ११.९९ टक्के वाढ झाली. तर नांदगाव मतदारसंघात १०.८७ टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल नाशिक मध्य मतदारसंघात ९.२८ टक्के मतदान वाढले आहे. तर निफाडमध्ये २०१९ मध्ये ७५.१३ टक्के मतदान झाले असताना यंदा त्यात १.१ टक्क्यांनी घट होउन ७४.१२ टक्के मतदान नोंदविले गेले. त्यामुळेच वाढीव मतदान कोणाला फायदेशीर ठरते यावरुन मतदारांमध्ये उत्सुकता लागली आहे.
मतदारसंघ.....२०१९.....२०२४.....वाढ
नांदगाव.....58.89.....70.76..... +10.87
मालेगाव मध्य.....67.61.....69.88.....+ 2.27
मालेगाव बाहय.....59.35.....67.75.....+ 8.40
बागलाण.....59.94......68.15.....+ 8.21
कळवण 72.55.....78.43.....+ 5.88
चांदवड 68.93.....76.93..... + 8
येवला 67.57.....76.3.....+ 8.73
सिन्नर 65.85.....74.85..... + 9
निफाड 75.13..... 74.12..... -1.1
दिंडोरी 69.66.....78.08..... + 8.39
नाशिक पूर्व 50.66..... 58.63..... + 8.02
नाशिक मध्य 48.40.....57.68.....+ 9.28
नाशिक पश्चिम 54.34.....56.71.....+ 2.37
देवळाली 54.81.....63.39.....+ 8.58
इगतपुरी 64.34.....76.33..... +11.99
एकूण 62.60.....69.12.....+ 6.52
विकासापेक्षा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच सर्वच राजकीय पक्षांनी धन्यता मानली. महायुतीमधील घटक पक्षांकडून कटेंगे तो बटेंगे, महिला सुरक्षितता, लाडकी बहिण योजना अशा विविध मुद्यांवर निवडणूक लढवली गेली. तसेच विरोधातील महाविकास आघाडीने संविधानाची सुरक्षितता, महिला सुरक्षितता, विरोधकांवरील वैयक्तिक टीका-टिपण्णी, गद्दारी अशा मुद्यांवर निवडणूकीत प्रचार केला.