नाशिक : कनाशी शासकीय आश्रमशाळेतील मुलींचे मुख्याध्यापिकांविरोधात आंदोलन

नाशिक : कनाशी शासकीय आश्रमशाळेतील मुलींचे मुख्याध्यापिकांविरोधात आंदोलन
Published on
Updated on

कळवण; पुढारी वृत्तसेवा : कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत असलेल्या कनाशी शासकीय आश्रमशाळेतील मुलींनी मुख्याध्यापिकेच्या मनमानी विरोधात १५ किमी चालत धडक मोर्चा काढला. या विद्यार्थीनींनी प्रकल्प कार्यालयात ठिय्या मांडत मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रकल्प अधिकारी यांच्या मुख्याध्यापिकेला कार्यमुक्त करण्याचा प्रस्तावाच्या आदेशानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कनाशी येथील शासकीय आश्रम शाळेच्या मुलींनी मुख्याध्यापिका यांच्यावर कारवाई करण्याची मागणी घेऊन आंदोलन केले. इयत्ता नववी ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थींनीनी धडक मोर्चा १५ किलोमीटर चालत प्रकल्प कार्यालय गाठले. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत ही कनाशी शासकीय आश्रम शाळा येते.

सुमारे २५० च्या संख्येने रस्त्याने निघालेल्या या मुली "आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे, हमारी मांगे पुरी करो,अशा घोषणा देत आंदोलन केले. दरम्यान जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय शिरसाठ सह स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि तहसीलदार बंडू कापसे यांनी मुलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु आमच्या समस्या प्रकल्प अधिकाऱ्यांनाच सांगणार असा हट्ट धरत कार्यालयात ठाण मांडले.

यावेळी स्थानिक प्रशासनाने हतबल होऊन दिल्ली येथे कामासाठी गेलेल्या प्रकल्प अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकल्प अधिकाऱ्यांशी सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी मुख्याध्यापक अर्चना जगताप यांच्याबाबत विविध तक्रारींचा पाढाच मुलींनी प्रकल्प कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांसमोर मांडला.

आदिवासी मुलींना त्यांच्या पालकांना तसेच आश्रम शाळेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, थेट लाभार्थी खात्यातील पैसे जमा करणे, विद्यार्थिनींना आदिवासी, अयोग्य शब्दात हिणवणे, राज्यस्तरीय स्पर्धेत जिंकून आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान न करणे, परीक्षा कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेणे अशा अनेक तक्रारी थेट प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे मांडल्या. आश्रम शाळेतील या मुलींच्या तक्रारींची दखल घेत प्रकल्प अधिकारी यांनी मुख्याध्यापक अर्चना जगताप यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ कार्यमुक्त करण्याच्या प्रस्तावाचे आदेश दिले आहेत.

कनाशी आश्रम शाळेची गुणवत्ता घसरली

कळवण प्रकल्प कार्यालया अंतर्गत असलेल्या आश्रम शाळांमध्ये कनाशी आश्रम शाळा ही गुणवत्तेच्या बाबतीत क्रमांक एक होती. परंतू गेल्या ४ महिन्यांपासून मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेल्या अर्चना जगताप यांच्या गैर वर्तनामुळे विद्यार्थी, पालक आणि आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचारी दहशतीखाली वागत असल्याची तक्रार मुलींकडून करण्यात आली आहे. या मुख्याध्यापिकेच्या गैरवर्तनाबाबत आमदार नितीन पवार यांनी देखील प्रत्यक्ष आयुक्तांशी चर्चा केली होती. परंतु तरीही मुख्याध्यापक जगताप यांची मुजोरी थांबली नसल्याचे दिसून आले. अर्चना जगताप यांच्या गैरवर्तणुकीबाबत दुसऱ्या आश्रम शाळेत कामावर असताना देखील अनेक तक्रारी यांच्याबाबत दाखल झालेल्या होत्या. आदिवासी भागात राहून आदिवासी मुलांना जातीवाचक अरेरावी करणाऱ्या मुख्याध्यापिका विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, जयपुर येथील सरपंच सुनील गायकवाड यांसह तालुक्यातील आदिवासी सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

तक्रारदार मुलींची प्रकल्प कार्यालयाकडून जेवणाची व्यवस्था

दरम्यान प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना मुलींच्या मोर्चाची माहिती सकाळी प्राप्त होताच पोलीस प्रशासनासह, महसूल विभाग, आरोग्य विभागातील कर्मचारी संपूर्ण मोर्चा रस्त्यात तैनात करण्यात आले होते. तसेच उपाशीपोटी तक्रारीसाठी आलेल्या मुलींची जेवणाची व्यवस्था प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news