नाशिक : कांदा खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित; मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची कारवाई

file photo
file photo

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : मालेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीसह अंतर्गतच्या सर्व उपबारातील कांदा खरेदी न करणाऱ्या परवानाधारक व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात येत असून,, बाजार समितीने कांदा खरेदीसाठी दिलेले शेड, गाळे, जागाही परत ताब्यात घेण्यात येत असल्याचे पत्र संबंधित जनरल कमिशन एजंट, अ वर्ग नं1 व्यापारी (खरेदीदार) यांना बाजार समितीने दिले आहे.

मालेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अद्वय हिरे व सचिव अशोक देसले यांनी समितीच्या मालेगाव, झोडगे, निमगाव व मुंगसे येथील कांदा खरेदीदार व्यापारी, जनरल कमिशन एजंट/अ वर्ग नं. 1 खरेदीदार व्यापारी यांना तशी नोटीस बजावली आहे. कांदा खरेदी व्यवसायासाठी आडत्या व खरेदीदार व्यापारी म्हणून बाजार समितीने परवाने दिले आहेत. परंतु, कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी व आडत्यांनी 20 सप्टेंबरपासून कांदा खरेदी बंद केल्याने शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी झाली आहे.

शेतमालाची खरेदी विक्री करण्यास असमर्थ ठरणाऱ्या परवानाधारक आडते- खरेदीदार, व्यापाऱ्यांविरुध्द महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनिमय) अधिनियम 1963 मधील कलम 29 (2) (3) नुसार त्यांचे अनुज्ञाप्ती निलंबीत किंवा रद्द करण्याचे अधिकार बाजार समितीस आहेत. तसेच बाजार समितीने बाजार आवारातील व आवाराबाहेरील गाळे, भुखंड (खळे) यांचेसह बाजार समितीने दिलेल्या इतर सोयी-सुविधा परत ताब्यात घेवू शकते, असेही सदरच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला यापूर्वी दिलेल्या पत्रानुसार कांदा लिलाव बंद करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. तत्पूर्वीच संबंधितांना कांदा खरेदी बंद केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news