

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : दर्जेदार अन्न निर्मितीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाले. तर देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी बनेल. आणि गरिबीमुक्त होईल. त्यासाठी सरकारसोबत जनतेचा पुढाकार आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक शेतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषि, शेतकरी कल्याण मंत्री तथा ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चव्हाण (Shivraj Singh Chouhan) यांनी आज (दि.७) येथे केले.
मंत्री चव्हाण यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र द्वारे सिलेज आधारित परिसर विकास कार्यक्रम (CADP) अंतर्गत उभारण्यात आलेल्या कृषक ज्ञान विज्ञान मंडपम् आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क या वास्तूंचा लोकार्पण सोहळा पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, राजेश पाडवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, एमसीआरसीएम मुंबईचे कार्यकारी अधिकारी निलेश सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. कार्यकारिणी सदस्य मा.वी. भागय्याजी, डॉ. एस.के. रॉय, डॉ. गजानन डांगे, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य सचिव डॉ. एन.जी. शहा, डॉ. हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले, सचिव डॉ. नितीन पंचभाई, कृषि विज्ञान केंद्र प्रमुख राजेंद्र दहातोंडे, कोळदाचे सरपंच मोहिनी वळवी आदी यावेळी उपस्थित होते.