

नंदुरबार : सर्वत्र उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा होत असतानाच नंदुरबार शहरात पतंगाच्या मांजाने गळा कापल्यामुळे सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने शहरवासी हादरले आहेत. या मुलाला मोटरसायकलवर बसवून त्याचे आजोबा नेत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली त्यावेळी त्यांनी केलेला आक्रोश नागरिकांना हेलावून टाकणारा होता.
या दुर्घटनेची माहिती अशी की, नंदुरबार शहरातील मोठा माळीवाडा भागात राहणारा सात वर्षीय कार्तिक एकनाथ बोरवे या नातवाला घेऊन त्याचे आजोबा मोटरसायकलने जात असताना अचानक त्यांच्या अंगावर पतंगाचा मांजा आला आणि त्याच्याने कार्तिकचा गळा कापला गेला. त्याच्या गळ्याला झालेली जखम पाहून त्यांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात धाव घेतली नंतर शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु दुर्दैवाने उपचार चालू असताना कार्तिकचा मृत्यू झाला. सध्या पोलीस दलाकडून रोजच नायलॉन मांजाच्या विक्रेत्यांवर छापे टाकले जात असले तरी मोठ्या प्रमाणात या मांजाचा वापर शहरात चालू आहे सर्वत्र झाडावर विद्युत खांबांवर आणि रस्त्यावर त्याचे लांबच लांब धागे आडवे येत असतात याविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. परिणामी मांजामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी पसरताच जिल्हा रुग्णालयात मोठा संतप्त जमाव चालून आला. तथापि कोणताही अनुचित प्रसंग घडलेला नाही. प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन मोठे कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.