

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील जमाना (चापडापाडा) येथे सामाईक शेतीतील निलगीरीचे झाड कापण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादामध्ये चार जणांनी शेतकरी पिता-पुत्रावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर गुलदारसिंग पाडवी (वय 33, व्यवसाय – शेती, रा. जमाना, ता. अक्कलकुवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार (दि.14) रोजी सकाळी 11 वाजता शंकर पाडवी हा वडील गुलदारसिंग पाडवी यांच्यासोबत शेतातील निलगीरीचे झाड कापत होते. त्याचवेळी गावातील पृथ्वीसिंग करमसिंग पाडवी, विरसिंग पृथ्वीसिंग पाडवी, दिनेश पृथ्वीसिंग पाडवी आणि रविदास पृथ्वीसिंग पाडवी हे चौघे घटनास्थळी आले. झाड कापण्याच्या कारणावरून त्यांनी वाद घालत पिता-पुत्र या दोघांवर अचानक हल्ला चढवला.
या मारहाणीत शंकर पाडवी यांना हाताबुक्यांनी आणि कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. त्यांचे वडील गुलदारसिंग यांना दगडाने, लाथाबुक्क्यांनी तसेच गळ्यावर व गुप्तांगावर गंभीर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात वडील गुलदारसिंग पाडवी यांचा जागीच मृत्यू झाला तर शंकर पाडवी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे पुढील तपास करत आहेत.