नंदुरबार : आज माघारीच्या अंतिम मुदतीत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिना गावित यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यामुळे अक्कलकुवा मतदारसंघात सर्वात रंगतदार राजकीय लढाई रंगणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री के सी पाडवी, शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी हे अन्य प्रमुख उमेदवार येथे रिंगणात आहेत. दरम्यान डॉक्टर हिना गावित यांनी भाजपाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार एडवोकेट के सी पाडवी हे सातव्यांदा काँग्रेस तर्फे उमेदवारी करीत आहेत. महायुतीतर्फे शिंदे शिवसेना गटाचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांची उमेदवारी दाखल आहे. तथापि या जागेवर महायुतीमधील भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनीही उमेदवारी दाखल केल्याने महायुतीमध्ये पेच निर्माण झाला होता. शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी केलेली गद्दारी थांबवलेली नाही म्हणून आपण आपली उमेदवारी कायम ठेवत असल्याचा खुलासा डॉक्टर हिना गावित यांच्याकडून करण्यात आला आहे.(Maharashtra assembly poll)
दरम्यान या मतदामतदारसंघात काँग्रेसचे असलेले व आता भाजपातून बाहेर पडलेले माजी मंत्री एडवोकेट पद्माकर वळवी यांनी भारत आदिवासी पार्टी तर्फे उमेदवारी कायम ठेवली. व्यतिरिक्त अपक्ष जलसिंग पावरा सुशीलकुमार पावरा आणि अन्य एक असे उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर हिना गावित यांनी भाजपातील पदांचा राजीनामा देऊन उमेदवारी कायम ठेवल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार केसी पाडवी यांच्यासमोर मोठे आव्हान राहणार त्याचबरोबर महायुतीचे तथा शिंदे गटाचे उमेदवार आमशा पाडवी यांना देखील मोठी लढाई लढावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान माध्यमांना माहिती देताना डॉक्टर हिना गावित यांनी म्हटले आहे की, "नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित हे आहेत. असे असताना शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा नेते महायुतीमध्ये सक्रिय न राहता उघडपणे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला बळ देत आहेत. भाजपाच्या विरोधातील त्यांच्या या भूमिकेविषयी याच्यापूर्वी देखील पक्षाच्या वरिष्ठांना सांगून झाले असून आज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रतीक्षा केली. तथापि या परिस्थितीमध्ये बदल घडला नाही.(Maharashtra assembly poll)
शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी गद्दारीची भूमिका सोडलेली नाही. म्हणून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून मी दाखल केलेले माझी उमेदवारी कायम ठेवली असून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी तसेच आमचे हक्क अबाधित राखण्यासाठी पुढची लढाई लढणार आहे. माझ्या या भूमिकेला स्थानिक जनतेचा या गोष्टीला भरभरून पाठिंबा आणि प्रतिसाद आहे. महायुती मधील व पक्षातील शिस्तीचा भाग म्हणून तसेच राजकीय संकेत पाळून मी भाजपाच्या पदांचा राजीनामा पाठवत आहे.