

नंदुरबार : स्पर्धात्मक युगाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी शालेय जीवनापासूनच तयार केले पाहिजे. यात शिक्षकांची भूमिका मोलाची ठरते. त्यामुळे शिक्षकांनी 'टॅलेट सर्च' सारख्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड यांनी केले.
आदिवासी विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्तेचा शोध घेण्याच्या उद्देशाने दैनिक 'पुढारी' आणि आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प यांच्यातर्फे आयोजित शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवारी (दि. ४) तळोदा येथील सांस्कृतिक भवनात झाली यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सहा. प्रकल्प अधिकारी (शिक्षण), के. सी. कोकणी, विस्तार अधिकारी आर. पी. वळवी, कार्यालय अधीक्षक शीतलकुमार वळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना गायकवाड म्हणाले की, सर्वच क्षेत्रात मोठी स्पर्धा वाढली आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना केवळ अकॅडमीक शिक्षण देणे पुरेसे ठरणार नाही, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना बौद्धिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्पर्धा परीक्षा उपयुक्त ठरतात. या परीक्षेची संधी दैनिक 'पुढारी'ने टॅलेंट सर्चच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे, त्याचा पुरेपूर लाभ विद्यार्थ्यांना करून देण्याचे आवाहन शिक्षकांना केले. सहा. प्रकल्प अधिकारी के. सी. कोकणी यांनी 'पुढारी टॅलेंट सर्च' परीक्षा विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण पाया ठरणार असल्याचे सांगितले. तर विस्तार अधिकारी आर. पी. वळवी यांनी शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेचे असलेले महत्त्व विशद केले. अधीक्षक शीतलकुमार वळवी यांनी विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे शिक्षकांनी आतापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा मार्ग दाखविण्याचे अवाहन केले.
स्वागत व प्रस्तावना दैनिक 'पुढारी'चे कोल्हापूर येथील वितरण व्यवस्थापक अशोक पाटील यांनी केले. यात आदिवासी विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्तेचा शोध घेण्याच्या उद्देशाने दै. 'पुढारी' आणि आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांच्यातर्फे 'पुढारी टॅलेंट सर्च' एक्झाम होत असून, कशा प्रकारे हा उपक्रम राबविला जात आहे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. प्रकल्प समन्वयक राजेंद्र महाजन यांनी आभार मानले. या प्रसंगी सर्व शाळांतील मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
प्रशिक्षक प्रवीण पाटील आणि प्रशांत मगरे यांनी परीक्षेच्या संदर्भाने विद्यार्थ्यांचा सराव करून घेताना काय काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. मराठी आणि इंग्रजी भाषेविषयी माहिती दिली. त्याचबरोबर स्थानिक पावरी, कोकणी, भिलोरी भाषेतून विद्यार्थ्यांशी संवाद करून या कठीण भाषेतील प्रश्न कमीत कमीवेळेत कसे सोडवून घ्यावे, गणित आणि बुद्धिमत्ता संदर्भातील प्रश्न कमी वेळेत जास्त कसे सोडवावे याच्या ट्रिक्स दिल्या.