

नंदुरबार : व्याजाने घेतलेले पैसे परत करावे यासाठी सातत्याने तगादा लावून त्रास दिला जात असल्यामुळे एकाने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना नंदुरबार शहरात घडली. याप्रकरणी जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नंदुरबार शहरात अवैध सावकारी वसुली धुमाकूळ घालत आहे, हे या दुर्घटनेने अधोरेखित केले आहे. अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करणाऱ्या गुंड प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यात शासकीय यंत्रणा सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा सूर उमटला आहे.
याप्रकरणी पोलीस सूत्राने दिलेली अधिकृत माहिती अशी की, सर्वत्र सरत्या वर्षाला निरोप देण्याचा आणि नववर्षाच्या स्वागताचा आनंद साजरा करत असताना वर्षाच्या अखेर मंगळवार, दि. 31 डिसेंबर 2024 रोजी रवींद्र येलवे या तरुणाने (प्लॉट क्र. ३९ देवमोगरा कॉलनी, कोकणी हिल, नंदुरबार) राहत्या घरी गळफास घेतला.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कविताबाई रविंद्र येलवे (वय- ३७) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, रविंद्र याने उसनवार घेतलेली रक्कम आणि व्याज ताबडतोब द्यावे, यासाठी सावकाराकडून तगादा लावण्यात आला होता. त्या त्रासाला कंटाळून रवींद्रने जीवनयात्रा संपवली. या फिर्यादीवरून जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सचिन चौधरी, दीपक चौधरी आणि आकाश सोनवणे या तीन जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे अधिक तपास करीत आहेत.