

नंदुरबार : धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातून नंदुरबार येथील जलतरण तलावात पोहायला गेलेल्या सहा अल्पवयीन मित्रांपैकी एकाचा अचानक जलतरण तलावात मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ललित सुधीर पाटील असे मृत तरूणाचे नाव आहे. पोहायला आलेल्या मुलांना पुरेशी सुरक्षा साधने दिली नसल्याने मृत्यू झाला की अन्य कारणाने मृत्यू झाला? याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान बामणे तालुका शिंदखेडा गावातील पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ललित सुधीर पाटील, निलेश सुनिल पाटील , हर्षल संजय पाटील , दुर्गेश प्रविण पाटील , हितेश अधिकार पाटील, हरिष दगड्डु निकम हे मित्र आज 3 एप्रिल 2025 रोजी दुपारी बारा वाजता नंदुरबार शहरातील छत्रपती नाट्यमंदिर शेजारील बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथे पोहोण्यासाठी आले होते. तेव्हा सर्वजण पाच फूट खोल पाण्यात उतरलो. परंतु ललित सुधीर पाटील हा आठ फूट खोल पाण्यात पोहण्यासाठी केव्हा उतरला हे मित्रांना लक्षात आले नाही. बराच वेळ झाल्यानंतर अचानक आठ फूट खोल पाण्यात पोहणाऱ्या काही मुलांनी अचानक ओरडा सुरू केला ते ऐकून उद्यानातील गार्ड धावत आला आणि त्याने ललित पाटील याला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्याला नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान डॉक्टरांनी ललित पाटील यास मृत घोषित केले. त्यामुळे ललित पाटील यांच्या परिवारावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान या घटनेवरून संबंधित ग्रामस्थांनी व नागरिकांनी संताप व्यक्त केला.