

नंदुरबार : दाराशी केळी विकायला आलेल्या केळी विक्रेत्याने केळ देण्याच्या आमिषाने जवळ बोलावून अवघ्या आठ वर्षीय मुलीशी भर दिवसा अंगणात अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार लगेचच लक्षात आल्यामुळे तिच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यामुळे पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई केली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत ८ वर्षे वयाची निर्भया बालिका नंदुरबार शहरातील जुनी सिंधी कॉलनी येथील रहिवासी आहे. शिक्षक असलेल्या तिच्या वडिलांनी दिलेले फिर्यादीत म्हटले आहे की, ही मुलगी घराच्या बाहेर अंगणात खेळत असतांना घरासमोर मुस्तकीम ताजमोहम्मद बागवान (वय- ४७) हा केळी विक्रेता हातगाडीवाला आला. त्यावेळी याने तिला त्याच्याकडे बोलावुन तिच्या हातात केळी दिली. नंतर स्वतः जवळ ओढून तिच्या डोक्यावर व शरीरावर सर्वत्र बळजबरीने हात फिरवला. तिच्या गालावर पप्पी घेतली, एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा बालिकेला वाईट उद्देशाने जवळ बोलावतांना आढळला असल्याचे पोलिसांकडे नोंद करण्यात आलेल्या फिर्याददाराने म्हटले आहे.
शनिवार (दि. 8) रोजी सकाळी 11.30 वाजता आणि रविवार ( दि.9 ) रोजी सकाळी 11.30 वा. दरम्यान असे दोन वेळेस हा प्रकार घडला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. म्हणून केळी विक्रेता मुस्तकीम ताजमोहम्मद बागवान (वय- ४७ धंदा- केळी विक्री हातगाडी रा. बागवान मोहल्ला ता. जि. नंदुरबार) याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक छळवणुक करुन विनयभंग केल्याच्या आरोपाखाली बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधि. २०१२ चे कलम ८,१२ आणि अन्य कलमांप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव हे पुढील तपास करीत आहेत.