

नंदुरबार - ग्राम महसूल अधिकाऱ्याला घरात घुसून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असताना आणि त्यावरून तलाठी महासंघाने आंदोलनात्मक पवित्रा घेतलेला असताना नवापूर तालुक्यात डंपर चालकाने डंपर पळवून नेत ग्राम महसूल अधिकाऱ्याला धमकावण्याचा आणखी दुसरा प्रकार घडला. वाळू माफीयांच्या मुजोरीकडे या दुसऱ्या घटनेमुळे आणखी लक्ष वेधले गेले आहे.
या दुसऱ्या घटनेप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रबेन कातुड्या गावीत वय ३८ वर्ष सरकारी नोकरी (ग्राम महसुल अधिकारी रा. मासलीपाडा पो. हळदाणी ता. नवापुर) हे सजा वडकळंबी येथे अवैध रित्या गौण खनिजाची वाहतुक करणाऱ्या भरारी पथकात कार्यरत आहेत. त्या ठिकाणी तपासणी करत असताना सिंग्या रेत्या कुवर आणि पिंट्या वेच्या गावीत (फरार) दोन्ही रा. ओटा ता. सोनगड जि. तापी हे दोन जण नवापुर तालुक्यातील प्रतापपुर गावात नदी पात्रात अवैधरित्या गौण खनिजाची उत्खनन करुन विना नंबरचे डम्पर मध्ये भरत असतांना आढळून आले. परंतु भरारी पथकास पाहुन डम्पर सोडुन पळुन गेले. रबेन गावित यांनी सदरचे डम्पर ताब्यात घेतला आणि पुढील कारवाईसाठी नवापूर येथे आणत असताना असतांना सिंग्या कुवर आणि पिंट्या गावेत या दोघांनी त्यांना अडवले आणि पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकावले. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करुन भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ केली व दमदाटी करुन धमकी दिली म्हणुन गुन्हा नोंद करण्यात आला.