

नंदुरबार - जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग स्वातंत्र्य मिळाल्यापासून विद्युत पुरवठ्यापासून वंचित होता. कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. अखेर या सर्व गावांना सर्व पाड्यांना वीज पुरवठा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी 400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सोमवार (दि.14) धडगाव सारख्या अतिदुर्गम तालुक्यात आणि तोरणमाळ परिसरात अनेक पाड्यांना गावांना वीज उपलब्ध झाली, असे भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा माजी खासदार डॉक्टर हिना गावित म्हणाल्या.
तोरणमाळ भागातील अतिदुर्गम नर्मदा काठच्या गावापर्यंत विद्युत खांब आणि विद्युत पुरवठा करणारे सयंत्र तसेच ऊर्जेचे दिवे बसविण्यात आले आहेत. त्यासह विविध विकास कामांचा आणि 35 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते व डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की, अतिदुर्गम भागातील केलापाणी, सिंधीदिगर, सावऱ्या, फलई, भावरी, झापी, खडकी, कुंड्या, भादल आदी गावांमध्ये वीज पुरवठा करणारे इलेक्ट्रिक पोल केबल यांच्या उभारणीचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रमांना सामाजिक कार्यकर्ते सुभाष अप्पा पावरा, भाजपा माजी तालुकाध्यक्ष शिवाजी पराडके, भाजपा तालुका अध्यक्ष हिरा पाडवी, जयसिंग दादा, माजी नगराध्यक्ष लतेश मोरे, महावितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी भाजपा पदाधिकारी गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते.