

नंदुरबार : शहरापासून जवळच निझर रस्त्यावरील एका बंगल्यात सुरू असलेल्या देहविक्रय व्यवसायावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. चार पीडित स्त्रियांची सुटका करून बंगला मालकासह ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील, नंदुरबार ते निझर रोड दरम्यान असणाऱ्या लाल/त्रिकोणी बंगल्यामध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पथक कल्याणी रेसिडेन्सीपुढे काही अंतरावर असलेल्या या बंगल्याजवळ गेले असता तेथे बंगला क्रमांक 2 मध्ये काही संशयित हालचाली दिसल्या. छापा टाकला असता बंगल्यात देहविक्री व्यवसाय चालू असल्याचे आढळले. याप्रसंगी स्वतः बंगला मालक संजय ब्रिजलाल चौधरी (49, रा. प्लॉट नं. 43, जय समाधी नगर, नंदुरबार) याच्यासह ग्राहक, धर्मेश वसंतभाई वसावा (25, रा. उमरपाडा देवरुपम, जि. सुरत), विपूल जयंतीभाई वसावा (27), अशोक सुदाम पाटील (42), हर्षेद कांतीलाल पाटील (30, रा. लोणखेडा, ता. शहादा), अनमोल कुवरसिंग वसावा (29, रा. सागबारा, ता.नलगाव, जि. नर्मदा), राहुल केशव गामित (34, रा. सिंगपुर, ता. सोनगड, गुजरात), आशिष हिरालाल वसावा (27, रा. मोठी देवरुपण ता.उमरपाडा, जि. सुरत), हर्षेद विश्वनाथ गावित (26), नितेश धिरसिंग वसावा (21), अर्जुन दिनेश वसावा (21, रा. वडगाव, ता. उमरपाडा, जि. सुरत) असे अकरा जण मिळून आले. तसेच चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. 5 हजार 650 रुपये किमतीचे मद्य, गुटखा व इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव हे करीत आहेत.