

नंदुरबार - ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे स्वतःला वकील म्हणवतात. परंतु त्यांची डिग्री एकदा तपासून घेतली पाहिजे. कारण, 'जनजाती' हा शब्द संविधानात आहे, हेच त्यांना माहीत नाही; या शब्दात माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी खासदार गोवाल पाडवी यांना टोला लगावला.
आदिवासींचे थोर नेतृत्व धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जनजाती गौरव दिन'साजरा करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा; असे गोवाल पाडवींचे म्हणणे असेल तर, सर्वप्रथम त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा; अशी सणसणाटी मागणी देखील डॉक्टर हिनाताई गावित यांनी माध्यमांशी बोलताना केली.
थोर आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजागतिक गौरव सेवा सप्ताह साजरा केला जात असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात आदिवासींच्या गौरवार्थ भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु सर्वत्र हे सोहळे साजरे होत असतानाच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान खासदार ॲड. गोवाल पाडवी यांनी 'जनजाती' या शब्दालाच विरोध असल्याची भूमिका मांडून जनजाती गौरव दिनाला विरोध दर्शवला. इतकेच नाही तर, भाजपाचे यामागे षडयंत्र असून जनजाती आणि वनवासी हे शब्द आदिवासींसाठी वापरणे बंद करावे, तसेच 'जनजाती गौरव दिन'साजरा करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा; असेही खळबळ जनक वक्तव्य गोवाल पाडवी यांनी केले.
यावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी माजी खासदार हिनाताई गावित यांना प्रतिक्रिया विचारली असता, भगवान बिरसा मुंडा हे इंग्रजांच्या विरोधात लढा देत होते आणि अवघ्या 25 व्या वर्षी त्यांनी बलिदान दिले. देशाच्या विविध भागात कानाकोपऱ्यात आदिवासींचा असा गौरवशाली इतिहास आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या रावलापाणीची घटना तशातलीच आहे. देशभरातील तो इतिहास जनतेपुढे आणावा, आदिवासींमधील म्हणजेच जनजातींमधील अशा शूर वीरांचा गौरव केला जावा, या उद्देशाने 15 नोव्हेंबर रोजी 'जनजाती गौरव दिन' सर्वत्र साजरा होत असतो.
आंबेडकर लिखित संविधानावर प्रश्न उपस्थित करणे चूकच
गोवाल पाडवी यांना उद्देशून डॉक्टर हिनाताई गावित पुढे म्हणाल्या की, ॲड. गोवाल पाडवी हे स्वतःला वकील म्हणवतात. परंतु मला वाटते आधी त्यांचे डिग्री तपासली पाहिजे. कारण जनजाती हा शब्द संवैधानिक आहे. भारतीय जनता पार्टी किंवा अन्य कोणी हा शब्द आणलेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ संविधानातच अनुसूचित जमातीला म्हणजे शेड्युल ट्राईबला उद्देशून या शब्दाचा उल्लेख आहे. एक अर्थाने ॲड. गोवाल पाडवी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हे त्यांना शोभत नाही. त्यांनी फोटोसेशन पुरता संविधान हाती न धरता खरोखरचे उघडून वाचले असते तर, अशा प्रकारचे वक्तव्य केलेच नसते.
तर मग यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा
डॉक्टर हिनाताई गावित पुढे म्हणाल्या की, जनजाती गौरव दिवस साजरा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; असे जर गोवाल पाडवी म्हणत असतील तर, माझा प्रश्न आहे की, धरती आबा ज्यांना भगवान बिरसा मुंडा म्हणतात त्यांची जयंती साजरी करण्यात कोणता गुन्हा आहे? कोणत्या कलमानुसार यावर गुन्हा दाखल होऊ शकतो? वकील असल्यामुळे आधी त्यांनी ते स्पष्ट करावे. याउलट आदिवासी समाजातील एखाद्या शूरवीर नेतृत्वाची भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करायला विरोध करत असतील तर सर्वात आधी ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या विरोधातच देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे; असे डॉक्टर हिनाताई गावित शेवटी म्हणाल्या.