

नंदुरबार - एका महिलेचे लैंगिक शोषण करतांना अक्कलकुवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून नंदुरबार येथील उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून, पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले आहे. यापूर्वीही संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
फोटो व्हायरल करण्याची देत होता धमकी
याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस अंमलदार इम्रान खाटीक याने जुनी ओळख दाखवून पंधरा ते वीस दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वरून तिच्याशी मैत्री केली. नंतर प्रत्यक्ष भेटीत एकत्र फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान नंदुरबार शहराच्या बाहेरील बाबा रिसॉर्ट जवळ बोलावले. तिथून करजकुपे रोडवरील महिंद्रा पब्लिक स्कूल जवळील मैदानावर नेले. इम्रान अतिप्रसंग करू लागताच तिने आरडाओरड केली. तेव्हा धावून आलेल्या लोकांनी तिला सोडवले व इम्रानला मार देऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या हवाली केले. त्यावरून लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्रान खाटिकवर दुसऱ्यांदा कारवाई
या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या काही संघटना प्रमुखांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पत्रकार व माध्यमांशी बोलताना अधीक्षक अश्विनी सानप यांनी सांगितले की, पोलीस अंमलदार इम्रान खाटीक यांचेविरुध्द् गुन्हा रजिस्टर नंबर 429/2026 अन्वये पीडितेच्या फिर्यादीवरुन लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून, पोलीस दलातून त्यास निलंबित करण्यात आले आहे. उद्या दिनांक 28/11/2026 रोजी त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. याच्या पूर्वीही इमरान खाटीक याला वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. आता दुसऱ्यांदा कारवाई झाली आहे.
धर्मांतराचा संदर्भ तपासणार
हे लव जिहादचे प्रकरण असून पोलीस असल्याचा दाख दाखवून इमरानने याच्यापूर्वी किती महिलांचे शोषण केले याची चौकशी केली जावी तसेच त्याच्या मोबाईल मधील व्हिडिओ क्लिप्स तपासण्यात यावे; अशी मागणी हिंदू संघटनांमधील कार्यकर्त्यांकडून जोरदारपणे होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, काही वर्षांपासून त्याच्या विरोधात महिलांच्या तक्रारी असल्याचे बोलले जात असले तरी कोणी महिला तक्रार द्यायला पुढे न आल्यामुळे प्रत्यक्ष पोलीस रेकॉर्डवर कोणतीही नोंद झालेली नव्हती; तथापि पोलीस दलाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न असल्यामुळे आता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून सर्व शक्यता तपासल्या जातील.
त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून व्हिडिओ क्लिप्स आणि रेकॉर्डिंगची तपासणी त्या दृष्टीने सुरू करण्यात आली आहे. त्यांने केलेल्या लैंगिक शोषणाला धार्मिक संदर्भ आहेत की नाही हे देखील तपासले जाईल; असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सांगितले. सदर गुन्ह्याचा तपास उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. अमोल सातोदकर हे स्वतः करीत असून गुन्ह्यातील डिजीटल पुरावे गोळा करुन गुन्ह्याचा सखोल तपास करणेबाबत सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी दिलेल्या आहेत.