

नंदुरबार : उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस या नवीन रेल्वेगाडीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते शनिवार (दि.२७) रोजी करण्यात आला. त्यानंतर ही गाडी नंदुरबार स्थानकात दाखल होताच संसदरत्न माजी खासदार डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी हिरवी झेंडी दाखवून गाडी पुढे रवाना केली.
यावेळी बोलताना डॉ. हिना गावित म्हणाल्या, पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे सुविधा उपलब्ध होत आहेत. आता नंदुरबार स्थानकालाही अधिक गाड्यांचा थांबा मिळत आहे. या नव्या एक्सप्रेसमुळे नंदुरबारहून थेट जगन्नाथ पुरीला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.
अमृत भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये अशी...
ही रेल्वे पाच राज्यांना म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशा यांना जोडणार आहे
ट्रेन क्रमांक 19021 : उधना–ब्रह्मपूर (ही रेल्वे दर रविवारी सकाळी 7:10 प्रस्थान, दुसऱ्या दिवशी दुपारी 1:55 आगमन). सेवा प्रारंभ : 5 ऑक्टोबर 2025.
ट्रेन क्रमांक 19022 : ब्रह्मपूर–उधना (दर सोमवारी रात्री 11:45 प्रस्थान, दुसऱ्या दिवशी सकाळी 8:45 आगमन). सेवा प्रारंभ : 25 ऑक्टोबर 2025.
कार्यक्रमाप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुहास नाईक, माजी नगरसेवक लक्ष्मण माळी, मोहन खानवाणी, अविनाश माळी यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.