

नंदुरबार : बंद पडलेले पशुवधगृह सुरू करण्या विषयीचा ठराव पारित करण्याचा प्रयत्न नंदुरबार नगर परिषदेतील सत्ताधारी शिंदे गटाने करताच भाजपा नगरसेवकांनी प्रचंड विरोध केला. नकली हिंदुत्वाचा आरोप करीत भाजपा नगरसेवकांनी रघुवंशी गटाच्या म्हणजे शिंदे गटाच्या सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले. जोरदर निदर्शने करीत निषेध करण्यात आला. यामुळे नंदुरबार नगर परिषदेची आजची सर्वसाधारण सभा अत्यंत वादळी ठरली.
येथील नगरपरिषदेची आज दि.१ जून रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत अजेंड्यावर एकूण १२ विषय होते. यातील नंदुरबार नगरपरिषदेचे जुने पशुवधगृह महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार दुरुस्ती करणे, हा विषय क्रमांक 6 मांडला जाताच हरकत घेऊन भाजपा नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. 11 वर्षांपूर्वी बंद पडलेले कत्तलखाने दुरुस्त करणे म्हणजे गो हत्येला प्रोत्साहन देण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप करीत भाजपा नगरसेवकांनी हा प्रस्ताव रहित करण्याची मागणी लावून धरली. नगरसेवक पंकज चौधरी यांनी लेखी हरकत घेऊन लक्षणीय उपोषण करण्याचा इशारा दिला. परंतु नगराध्यक्षा सौ रघुवंशी आणि संपूर्ण सत्ताधारी गटाने त्यासह सर्व विषय मंजूर केले.
यावर संतप्त झालेले नगरसेवक हिरालाल चौधरी, आनंद माळी, पंकज चौधरी,चारूदत्त कळवणर, रेखा चौधरी, सरिता माळी, सुष्मा गावीत, शोभा चौधरी, निता मराठे,नरेश काकंरीया लक्ष्मण माळी, प्रकाश भोई,आकाश चौधरी, सतीश मराठे,जयेश चौधरी,दीपक चौधरी,निखिल चौधरी यांनी सभा त्याग केला. दुरुस्ती करण्याच्या नावाखाली बंद पडलेले कत्तलखाने पुन्हा सुरू करण्याचा नगरपालिकेने रचलेला डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही; असा निर्धार व्यक्त करीत नगर परिषदेच्या वरांड्यात उभे राहून फलक झळकवले.
गोहत्या बंद करा, अशा घोषणा देत जोरदार निषेध नोंदवला. यानिमित्ताने शिंदे सेनेतील रघुवंशी गटाचे नकली हिंदुत्व उघड झाले, असा आरोप माध्यमांसमर बोलताना विरोधी गटनेता हिरालाल चौधरी यांनी केला. तर नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी यांनी माध्यमांसमोर बोलताना स्पष्टीकरण दिले की, आम्ही सुद्धा हिंदू प्रेमी आहोत त्यामुळे शासनाने परवानगी दिलेल्या प्राण्यांचीच तिथे कत्तल केली जाणार असून गो हत्या होणार नाही याची आम्ही दखल घेणार आहोत.