

नंदुरबार : शहादा तालुक्यातील होळमोहिदा येथील प्रगतशील शेतकरी मुकुंद सुभाष पाटील यांना ‘केळी रत्न 2025’ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघ आयोजित तिसरी राज्यस्तरीय केळी परिषद माढा (जि. सोलापूर) येथे नुकतीच पार पडली. यावेळी पाटील यांना एकरी 30 टन इतके विक्रमी केळी उत्पादन घेतल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रत्येक वर्षी एकरी तीस टन अथवा त्याहून अधिक उत्पादन घेणाऱ्या उत्कृष्ट केळी उत्पादक शेतकऱ्यांना संघातर्फे ‘केळी रत्न’ पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी नंदुरबार जिल्ह्यातून मुकुंद पाटील यांची निवड झाली. हा पुरस्कार वितरण सोहळा प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या महाधन प्रायोजित परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माढाचे आमदार अभिजित पाटील, करमाळाचे आमदार नारायण पाटील, संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांच्या हस्ते मुकुंद पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण, राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील, राज्य सचिव किशोर चौधरी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पटेल हे उपस्थित होते.
मुकुंद पाटील यांच्या या यशाबद्दल नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष अंबालाल पाटील, कार्याध्यक्ष सौ. पुष्पा पटेल, तज्ज्ञ संचालक दीपक पटेल, शहादा तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
‘केळी रत्न 2025’ या राज्यस्तरीय पुरस्कार या तिसऱ्या राज्यस्तरीय केळी परिषदेला राज्यभरातून केळी उत्पादक शेतकरी, टिश्यू कल्चर केळी रोपे उत्पादक कंपन्या, व्यापारी, वितरक आदींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.