

नंदुरबार - रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिकेची सेवा मिळाली नाही आणि रुग्णवाहिका नाही म्हणून बांबूच्या झोळीतून भर पावसात नदीच्या पुरातून एका गर्भवती महिला रुग्णाला वाहून न्यावे लागल्याचा विदारक प्रसंग पुन्हा एकदा लोकांना पाहायला मिळाला. सुमित्रा विरसिंग वसावे, (वय 29) राहणार वेहगी बारीपाडा असे या महिला रुग्णाचे नाव असून पुराच्या पाण्यातून भर पावसात बांबूच्या झोळीतून तिला रुग्णालयापर्यंत पायपीट करत नातलगांना न्यावे लागले.
अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी, बारीपाडा गावाचा रस्ता नदीतुन जातो आहे.
पावसाळयात रूग्णांना, गरोदर मातांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठी अडचण होते.
जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागते.
हा विदारक प्रसंग दोन दिवसापूर्वीचा असून त्याचा व्हिडिओ व्हायरल करीत स्थानिक आदिवासी तरुणांनी संताप व्यक्त केला आहे. वर्षानुवर्षे या भागातून निवडून येत असलेले आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी काय करतात असा प्रश्न करू लागले आहेत. वर्षानुवर्षी रस्ते विकासावर निधी खर्च पडत असतानाही दुर्गम भागात रस्त्यांच्या अभावी रुग्णांना ॲम्बुलन्सची सेवा मिळत नाही आणि त्या ऐवजी बांबू लेन्स मध्ये म्हणजे बांबूच्या झोळीतून वाहून न्यावे लागते हे चित्र पुन्हा स्पष्टपणे समोर आले.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी, बारीपाडा गावाचा रस्ता नदीतुन जातो आहे. सद्या पावसाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मानवी साखळी करून पाण्यातून वाट काढत पैलतीरावर जावे लागते. वेहगी गावाचा मुख्य रस्तापासुन ते बारीपाडा, पाटीलपाडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. सदर पाडयात जाण्या येण्यासाठी खुप अडचणींचा सामना करावा लागतो. सदर पाडयामध्ये जातांना रस्त्यात मोठी दरी आहे व नदी नाल्यामधुन जावे लागते. पावसाळयाच्या दिवसात चार महिने इतर भागाशी संपर्क तुटतो तसेच बारीपाडा व पाटीलपाडा येथील लोकसंख्या सहाशेच्या जवळपास असुन पावसाळयात रूग्णांना, गरोदर मातांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून एकमेकांचा आधार घेत नदी पार करावी लागते हा नदीतील प्रवास जीवघेणा, जिकरीचा व त्रासदायक असतो.
पाडयांमध्ये रस्त्याची अत्यंत आवश्यकता असताना, शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वेहगी गावाच्या मुख्यरस्त्यापासुन ते पाटीलपाडा, बारीपाडा असा सहा कि.मी. चा रस्ता व त्यावर येत असलेले पुल बांधावे व परीसरातील पाडयातील जनतेची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात यावी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करूनही हा भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी,प. स. पालकमंत्री, आमदार, खासदार यांना निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.