

नंदुरबार - जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची नियुक्ती झाल्याने नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नंदुरबारला अजितदादा गटातील पालकमंत्री लाभण्याची ही दुसरी वेळ असून स्थानिक पदाधिकाऱ्यांना बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, लाडकी बहिण योजनेचे अध्यक्ष भरत गावित, महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगरे यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशन स्थळी मंत्री कोकाटे यांची भेट घेतली. तसेच पुष्पगुच्छ देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यावर नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेण्यात आली. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री माणिकराव कोकटे यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्ष संघटन वाढीस मदत होणार आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यासाठी पाठपुरावा करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले.
26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी नंदुरबार शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा मेळावा घेण्यात येणार असून त्यासाठी तयारी करण्यात येत आहे, असे डॉ. मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मदर टेरेसा हायस्कूलच्या प्रांगणात 26 जानेवारी रोजी दुपारी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात पक्ष संघटन, येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणूकासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचा हृदय सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अभिजित मोरे यांनी दिली.
गेल्या पंचवार्षिकमध्ये नंदुरबार जिल्ह्यात तीन पालकमंत्री बदलले होते. पहिल्या अडीच वर्षात आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचे अॅड. के. सी. पाडवी तर नंतरच्या अडीच वर्षात भाजपचे डॉ. विजयकुमार गावीत व राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांनी पालकमंत्रिपद सांभाळले होते. आक्रमक नेते म्हणून माणिकराव कोकाटे यांची ख्याती असून सहकाराचाही त्यांना अनुभव असल्याने जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या पक्ष संघटनात्मक विस्तारासाठी त्यांच्या नियुक्तीचा लाभ अपेक्षित असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.