

नंदुरबार - शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर बेफाम वेगाने एक फॉर्च्युनर वाहन आले आणि रात्री फेरफटका मारत रस्त्यावरून चालणाऱ्या माय-लेकाला त्यांच्या अबोल श्वानाला देखील निर्दयीपणे चिरडून तेवढ्याच वेगाने पसार झाले. हिट अँड रनच्या या धक्कादायक घटनेने शहरवासी संतप्त झाले असून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचा कठोरपणे बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.
धक्कादायक असे की, मयत पावलेल्या कल्पना वाघ यांचा याच दिवशी वाढदिवस होता आणि वाढदिवस साजरा करून मग शतपावली करायला त्या रात्री निघाल्या होत्या. वाढदिवसच त्यांच्या मृत्यूचा दिवस ठरल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्दैवी घटना सोमवार (दि.17) रोजी रात्री दहा वाजता घडली. मंगळवार (दि.18) रोजी मयत आई व मुलाची अंत्ययात्रा अत्यंत शोकाकुल वातावरणात काढण्यात आली.
द्वारकाधीश नगर, डोंगरगाव रोड, नेताजी डे स्कूल जवळ, शहादा येथील रहिवासी प्राथमिक शिक्षक गजानन सिताराम वाघ यांच्या पत्नी कल्पना वाघ या मुलगा आकाश (बंटी) समवेत घराजवळील रस्त्यावरून सोमवार (दि.17) रोजी रात्री दहा वाजता फेरफटका मारत होत्या. याचवेळी अचानक सुसाट वेगाने एक वाहन आले आणि त्यांना चिरडून तेवढ्याच वेगाने पुढे निघून देखील गेले. अपघात एवढा भयानक होता की दोघांचाही यामध्ये जागीच मृत्यू झाला, असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. अपघातस्थळी स्थानिकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डोंगरगाव रस्त्यावर दररोज सायंकाळपासून फेरफटका मारणाऱ्या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. दहा दिवसांपूर्वीच या रस्त्यावर जागोजागी गतिरोधक बसविण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाने निवेदनाद्वारे मागणी केली होती. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सायंकाळनंतर या रस्त्यावर मद्यपान करुन सुसाट वेगाने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालविणाऱ्यांची संख्येत वाढ झाली आहे. अशा मद्यपींना पोलिसांचा पायबंद राहीलेला नाही. अपघात घडवणारे फॉर्च्युनर वाहन (क्र. MH15 JA 5055) सुसाट वेगाने असल्याने हे वाहन पुढे आणखी एका ठिकाणी धडकली परंतु, वाहनचालक यावेळी त्या ठिकाणीच वाहन टाकून पसार झाला आहे. वेळीच निवेदनाची दखल घेत गतिरोधक टाकले असते तर दोघांचा जीव वाचला असता, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.