

नंदुरबार : सनातन संस्थेच्या वतीने ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ मंगल भवन येथे मोठ्या श्रद्धाभावात साजरा करण्यात आला. यावेळी धर्म आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी प्रत्येकाने झोकून देण्याचे आवाहन सनातन संस्थेचे उदय बडगुजर यांनी केले.
‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शन करत होते. त्यांनी सांगितले की, प्राचीन काळापासून अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या अधिक असली, तरी अंतिम विजय हा धर्माचाच होतो, कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद नेहमी धर्माच्या बाजूने असतो. आज भारतावर होणाऱ्या आंतरिक व बाह्य आक्रमणांचे खरे लक्ष्य हिंदू धर्म आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाप्रसंगी व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन आणि ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओचे प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञही यावेळी करण्यात आला. तसेच धर्म, अध्यात्म, साधना, स्वसंरक्षण, आयुर्वेद, ग्रंथ आणि फलक प्रदर्शन ठेवण्यात आले होते. यावेळी नंदुरबारचे गोरक्षक व अधिवक्ता विशाल जयस्वाल या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. हरिभक्त परायण भागवत कथाकार खगेंद्र महाराज यांनी सांगितले की, धर्मावर होणाऱ्या आघातांना सज्जनांची निष्क्रियता कारणीभूत आहे. धर्म ही भिंतीसारखा असतो; तो कोसळल्यास आपले अस्तित्वही नष्ट होईल. त्यामुळे धार्मिक सक्रियता आणि ग्रंथवाचन, संतसेवा, आचारधर्माचे पालन आवश्यक आहे. निवेदिता जोशी यांनी साधनेतून झालेल्या आध्यात्मिक प्रगतीबाबत अनुभव कथन केले.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, उद्योगपती रविभाई जैन, अधिवक्ते अविनाश पाटील, कुणाल चौधरी, डॉ. उपेंद्र शाह, डॉ. नरेंद्र पाटील, दिग्विजय ठाकरे आदी कार्यक्रमास उपस्थित होते. देश-विदेशातील हजारो भाविकांसाठी मराठीसह हिंदी, गुजराती, तमिळ आणि मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाइन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे अनोखे आयोजन करण्यात आल्याने सर्वांनाच गुरुपोर्णिमा महोत्सव आनंदात साजरा करता आला.