

नंदुरबार : राज्य शासनाच्या निर्णयानुसार घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याच अनुषंगाने शनिवार (दि.24) रोजी माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते विविध गावांतील लाभार्थ्यांना वाळू वाटपासंदर्भातील पत्रांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील, सागर तांबोळी, राजू मराठे, विविध गावांचे सरपंच, तसेच प्रशासनातील तहसीलदार, मंडल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गावित यांनी सांगितले की, "कोणीही बेघर राहू नये या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारने घरकुल योजना राबवली असून, नंदुरबार जिल्ह्यात तिची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. आतापर्यंत हजारो गरजूंना घरकुले मिळाली असून, अजूनही गरजू नागरिकांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. गावित पुढे म्हणाले की, राज्य सरकारने नुकताच घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली. आता वाळू उत्खनन, साठवणूक व विक्री ‘डेपो पद्धती’ऐवजी लिलाव पद्धतीने होणार आहे. तसेच नैसर्गिक वाळूच्या तुटवड्याचा विचार करून कृत्रिम वाळूला प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुढील तीन वर्षांमध्ये शासकीय व निमशासकीय बांधकामांमध्ये २० टक्के कृत्रिम वाळू वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. लिलाव पद्धतीने उत्खनन करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाळू गटातील 10 टक्के वाळू घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवली जाणार असून, त्यातून ५ ब्रास वाळू मोफत दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.