

नंदुरबार : नंदुरबार शहरात शुक्रवार (दि.16) रोजी सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. काही घरे पूर्णपणे कोसळली असून, काही घरांची अंशतः पडझड झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी शनिवार (दि.17) रोजी सकाळी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी पीडित नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या व प्रशासनामार्फत तत्काळ निवाऱ्याची व मदतीची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
"घरांची उभारणी होईपर्यंत प्रशासनाने नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करावी. शक्य त्या सर्व शासकीय योजनांचा लाभ पीडित कुटुंबांना त्वरित मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक पावले उचलणार आहे," असे आमदार गावित यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांना ‘घरकुल’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही केले. त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण माळी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बंधारहट्टी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडाली, भिंती कोसळल्या असून संसारोपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांसमोर निवारा, अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. पाहणी दरम्यान नागरिकांनी गावित यांच्यासमोर दुःखद परिस्थिती मांडली. डॉ. गावित यांनी यावेळी प्रशासनाला तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले.