

नंदुरबार - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका परप्रांतीय विद्यार्थ्याचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. त्याचवेळी मुलगा डॉक्टर बनण्याचे स्वप्न धुळीला मिळाल्याचा दुर्दैवी प्रसंग झेलावा लागलेल्या त्याच्या आई-वडिलांची हतबलता पाहून अनेकांचे हृदय हेलावून गेले.
मयंक हरीशंकर पंड्या असे या विद्यार्थ्याचे नाव असून राजस्थानच्या उदयपूर शहरातील तो रहिवासी होता. मयंक याच्या गळ्यातील दोरीला फास लावण्यासाठी वापरली जाणारी शास्त्रशुद्ध गाठ आढळून आली, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यामुळे मयंक याने आधीपासून गळफास घेण्याविषयी अभ्यास केला असावा का? यावर विद्यार्थी वर्तुळात अंदाज लावले जात आहेत. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. यामुळे अवघ्या 21 वर्षाच्या या विद्यार्थ्याने परीक्षा चालू असतानाच जीवन यात्रा का संपवली? याचे गुढ वाढले आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील गांधीनगर या कॉलनीत अंबिका ट्रेडर्स च्या मागील बाजूस असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील खोलीत मयंक हरिशंकर पंड्या वय 21 हा विद्यार्थी गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती शहर पोलिसांना गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2026 च्या रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान प्राप्त झाली. म्हणून तत्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी भेट दिली असता मयंक पंड्या हा पंख्याला बांधलेल्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन मरण पावलेल्या अवस्थेत आढळला.
त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी काही तासापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. घटना कळताच उदयपूर येथून मयंक याचे आई-वडील आणि अन्य नातलग तातडीने नंदुरबार येथे दाखल झाले. आज दिनांक 4 सप्टेंबर 2026 रोजी शासकीय जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयंकचे वडील उदयपूर येथे सहाय्यक बिडिओ पदावर कार्यरत आहेत. तरुण मुलगा गमावल्याचे दुःख असतानाही अत्यंत हतबल स्थितीत शव विच्छेदनासाठी आणि शव ताब्यात घेण्यासाठी आवश्यक पूर्तता करण्यासाठी ते एकटेच धावपळ करताना दिसून आले. शहर पोलीस ठाण्यात तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गळफासासाठी वापरलेल्या शास्त्रशुद्ध गाठीचे गुढ काय?
घटना उघडकीस आल्यानंतर ज्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली त्यांच्यापैकी काहीजणांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी अनेक तासांपासून मयंक कुठे दिसला नाही, अशी शंका मयंक राहत असलेल्या बाजूच्या खोलीतील मित्राला आली. म्हणून रात्री दहा वाजे दरम्यान मयंकच्या खोलीचा दरवाजा वाजवून कानोसा घेतला. बराच प्रयत्न करून सुद्धा प्रतिसाद मिळत नाही, असे लक्षात आल्यावर इतर प्रयत्न केले असता त्याच्या मित्रांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि प्राध्यापक यांना संपर्क केला. नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरवाजा तोडून प्रवेश करण्यात आला.
शास्त्रशुद्ध पद्वतीने मारली गाठ
काही प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले की, गळफासासाठी अभ्यासपूर्ण पद्धत वापरल्याचे दिसून आले. दोरीचे पहिले टोक खिडकीला घट्ट बांधलेले नंतर तिथून पंख्याला ती दोरी घट्ट बांधलेली होती शिवाय, गळ्यात जो फास अडकवला त्याची गाठ शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधलेली आढळली. मयंक याने आधीपासूनच या सर्व गोष्टींची मानसिकता बनवली होती का? शांत निर्मळ राहणारा मयंक इतक्या टोकाचे पाऊल उचलेल असे आतापर्यंत कधीच का जाणवले नाही? हा प्रश्न त्याच्या परिचयातील वर्तुळातून उपस्थित होत आहे. तथापि, अद्याप घटनेची माहिती घेणे सुरू असल्यामुळे घटनास्थळी नेमके काय आढळले हे सांगू शकत नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. मयंक याचा मोबाईल अधिक तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला असून मयंक कोणा कणाच्या संपर्कात होता, याचाही तपास सुरू केला आहे.
मेरीट मध्ये उत्तीर्ण होण्याचे रेकॉर्ड
मयंक पंड्या हा राजस्थान मधील उदयपूर शहरातील रहिवासी असून नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. अधिक माहिती घेतली असता, त्याच्या परिचयातील मित्रांनी सांगितले की, अभ्यासात तो अत्यंत हुशार होता. मेरिटमध्ये उत्तीर्ण होण्याचे त्याचे रेकॉर्ड होते. 700 पैकी 660 गुण त्याने मिळवले होते. आज 4 सप्टेंबर 2026 रोजी परीक्षा पेपर द्यायचा असल्याने त्याची जोरदार तयारी चालू होती. तणाव असल्याचे त्याच्या बोलण्यातून कधी माहीत झाले नाही. त्यामुळे परीक्षा देत असतानाच त्याने गळफास का घेतला? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. ज्या इमारतीत ही घटना घडली, त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर एकूण 6 खोल्या आहेत. एमबीबीएसचेच विद्यार्थी तिथे भाड्याने राहतात. पैकी मयंक सुद्धा एकट्याने राहत होता. तो कामापुरता मोजके बोलत असे, त्यामुळे त्याला नेमक्या कोणत्या समस्या आहेत याची माहिती कधी कोणाला मिळाली नाही; असे त्याला ओळखणाऱ्या काही जणांनी सांगितले.