Nandurbar Crime : उधारीच्या वादातून नंदुरबारात मजुरावर गोळीबार

बिलाडी शिवारात घडली घटना; मजुराचा जीव थोडक्यात वाचला, आरोपीवर गुन्हा दाखल
 firing incident
firing incidentpudhari photo
Published on
Updated on

नंदुरबार : उधारीचे पैसे परत न दिल्याच्या आणि शेतातील कामावर न आल्याच्या कारणावरून एका मजुरावर बंदुकीने गोळी झाडल्याची धक्कादायक घटना नंदुरबार तालुक्यातील बिलाडी शिवारात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीवर नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा येथील रहिवासी असलेल्या 'पप्पू' ऊर्फ संजय आनंदा वाघ (माळी) याचे बिलाडी शिवारात शेत आहे. एकतानगर येथील रहिवासी असलेला संजय मन्साराम ठाकरे हा त्याच्या शेतात मजुरीचे काम करत असे. संजय ठाकरे याने संजय माळी यांच्याकडून काही रक्कम उसने घेतले होते. या पैशांची परतफेड न करणे आणि शेतातील मजुरीचे काम सोडणे, या कारणांवरून काल दुपारी १ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

वाद विकोपाला गेल्याने संजय माळी याने रागाच्या भरात बंदुकीतून संजय ठाकरेवर गोळी झाडली. सुदैवाने, गोळी ठाकरे यांच्या कानाजवळून गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र या घटनेत तो जखमी झाला आहे.

पोलीस कारवाई

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांनी गोळीचे कव्हर (पुंगळी) जप्त केले आहे.

संजय ठाकरे यांच्या फिर्यादीवरून, संशयित आरोपी पप्पू ऊर्फ संजय आनंदा वाघ याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ३५१ (२), अजाज (SC/ST) अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(२)(व्ही.ए.) आणि शस्त्र अधिनियम कलम ३(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार करत आहेत.

सध्या जखमी मजुरावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका: पोलीस अधीक्षक

या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप म्हणाल्या की, "पैशांच्या वादातून हा प्रकार घडला असून, आरोपीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news