

नंदुरबार - दुधाळ जनावरांचे कृत्रिम रित्या दूध वाढवण्यासाठी जे इंजेक्शन दिले जाते त्याचे रसायन बनवणारा अड्डा नंदुरबार मध्ये पश्चिम बंगालच्या एका जणांच्या सहभागाने चालवला जात होता. पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत जनावरांना अपायकारक असलेल्या 20 लाखाच्या रसायनांच्या साठ्यासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नंदुरबार शहरात गवळीवाडा परिसरात तुकाराम ऊर्फ खोक्या लाला गवळी हा त्याच्या घरात वेगवेगळ्या रसायनांना एकत्र करुन ते रसायन इंजेक्शनद्वारे दुभत्या जनावरांना देऊन त्याद्वारे जनावरांचे दुधाचे प्रमाण वाढवतो पण, अपायकारक असुन त्या इंजेक्शनमुळे प्राण्यांच्या जिवितास व त्या प्राण्यांनी दिलेल्या दुधामुळे मानवी जिवितास धोका निर्माण होतो. अशा घातक रसायनांची हा इसम विक्री करीत आहे, अशी नंदुरबार जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी गोपनिय माहिती मिळाली होती.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत केले. पथकाने तुकाराम ऊर्फ खोक्या लाला गवळी याच्या याच्या नवा गवळीवाडा येथील घराची व गोडावूनची झडती घेतली. तेव्हा त्यांचेकडे रसायन बनविण्याचा कुठल्याही प्रकारचा परवाना नसतांना वेगवेगळया रसायनांचा वापर करुन म्हशींना पानविण्यासाठी रसायन बनवले जात असल्याचे आढळून आले तसेच एकूण 20 लाख 20 हजार 32 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्या ठिकाणी आशिक लियाकत सरदार, (वय 24 रा. परगणा, राज्य- पश्चीम बंगाल) हा रसायन इंजेक्क्शनमध्ये भरतांना मिळून आला.
वेगवेगळ्या प्रकारचे रसायन एकत्र करुन त्या रसायनाचा उपयोग दुभत्या जनावरांना देऊन त्याद्वारे दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण वाढविले जाते. हे रसायनमुळे तयार होणारे भेसळ युक्त दुध हे मानवी जिवीतास धोकादायक असते. तसेच जनावरांच्या जीवीतालाही धोका असतो. हे माहित असतांना देखील त्यांनी सदरचे कृत्य केल्याचे आरोपाखाली तुकाराम ऊर्फ खोक्या लाला गवळी, वय- (55 वर्षे, रा.नवा गवळीवाडा, नंदुरबार ) आणि आशिक लियाकत सरदार, (वय 24 रा. परगणा, राज्य पश्चीम बंगाल) यांचेविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांसह प्राण्यांचे छळ प्रतिबंध अधि, कलम 11(1) (ग) 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.
कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोहेकॉ महेंद्र नगराळे, राकेश मोरे, अजित गावीत, सचिन वसावे, पोना/दिपक वारुळे, नितीन गांगुर्डे, पोकों/रामेश्वर चव्हाण, आनंदा मराठे, अभय राजपूत, मपोशि/रोहिणी धनगर यांनी केली.