Nandurbar Crime | नंदुरबारला गोळी झाडून खुनाचा प्रयत्न; पाच लाखाची सुपारी घेतल्याचा खळबळजनक प्रकार उघड!

सूत्रधाराला पोलिसांकडून अटक, पैशाच्या वादातून पाच लाखाची सुपारी
Nandurbar Crime | नंदुरबारला गोळी झाडून खुनाचा प्रयत्न; पाच लाखाची सुपारी घेतल्याचा खळबळजनक प्रकार उघड!
Nandurbar Crime | नंदुरबारला गोळी झाडून खुनाचा प्रयत्न; पाच लाखाची सुपारी घेतल्याचा खळबळजनक प्रकार उघड!
Published on
Updated on

नंदुरबार - रेकी करून कारचा पाठलाग करीत मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी गोळी झाडून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा सनसनाटी प्रकार नंदुरबार येथे घडला. पैशाच्या वादातून पाच लाखाची सुपारी या दोघांना देण्यात आली होती असे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे व प्रमुख सूत्रधाराला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील जगतापवाडी परिसरास लागून असलेल्या तंत्रनिकेत कॉलेजच्या बाजुला 18 सप्टेंबर 2026 रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या दरम्यान हा सर्व घटनाक्रम घडल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार येथील व्यावसायिक मुकेश अर्जुन चौधरी आणि शहादा येथील सत्तार मोहन ठाकरे या दोघांची भागीदारी होती. ही भागीदारी फिस्कटल्यानंतर पैशाच्या देवाण-घेवाणीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्या वादातून ठाकरे याने 5 लाखाची सुपारी दिल्याचे आता तपासात उघड झाले आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या गुन्हेगारी इतिहासात सुपारी देऊन खून करण्याचा प्रयत्न झाल्याची ही पहिली घटना आहे.

असा उघड झाला गुन्हा

18 सप्टेंबर 2026 च्या रात्री पावणे बारा वाजेच्या दरम्यान, जगतापवाडी जवळील तंत्रनिकेतन कॉलेज परिसरात फटाक्यासारखा मोठा आवाज झाला. तेव्हा एका व्यक्तीला हेल्मेट घातलेले दोन जण काळया रंगाच्या कारचा पाठलाग करताना दिसून आले. म्हणून त्याने शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना तातडीने माहिती दिली असता पथकासह ते घटनास्थळी उपस्थित झाले. तपासणी करताना गोळीबार झाल्याचा त्यांना संशय आला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तेव्हा नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलवरील दोन जण पकडण्यात आले आणि खुनाची सुपारी घेतल्याचा खळबळ जनक प्रकार उघडकीस आला.

गुन्ह्याची एकूण पार्श्वभूमी

मुकेश अर्जुन चौधरी रा. नंदुरबार याचा आरोपी सत्तार ठाकरे व पंकज मिश्रा उर्फ दादु शेठ यांच्याशी पैशांवरुन वाद होता. म्हणून मुकेश चौधरी यास जिवेठार मारण्याच्या उद्देशाने ऑगस्ट २०२६ मध्ये कट रचला आणि देवेंद्र बैरागी व अभयसिंग चव्हाण या मध्य प्रदेशातील दोघांना या कामाचा मोबदला म्हणून 5 लाख रुपये देण्याचे कबूल केले. त्यानुसार सत्तार ठाकूर याच्या सांगण्याप्रमाणे नकाशा तयार करुन 18 सप्टेंबर रोजी सकाळी नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात तंत्रनिकेत कॉलेजच्या बाजुला आले. मुकेश चौधरी ठार मारण्याच्या उद्देशाने एक जिंवत काडतुस फायर करण्यात आले.

देवेंद्र गोकुलदास बैरागी वय-३४ वर्षे रा. फाजरपुरा, गाडीहाट्टा चौराह जवळ, उज्जैन (मध्यप्रदेश), अभयसिंग मोहनसिंग चव्हाण वय-४६ वर्षे रा.घर क्र. २११, निकास चौराह, उज्जैन (मध्यप्रदेश), सत्तार ठाकरे वय-४३ रा.अनकवाडा म्हसावद ता. शहादा जि. नंदुरबार, पंकज मिश्रा उर्फ दादु शेठ रा. शहादा शहादा ता. जि. नंदुरबार, रवि डाबी रा. उज्जैन (मध्यप्रदेश) आणि बेहरा शेठ रा.रायगड ता.उच्छल जि. तापी (गुजरात राज्य) या सहा जणांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्‍यांच्याकडून पिस्तूल कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news