

नंदुरबार : बँक ऑफ महाराष्ट्रच्या ‘महा बँक सॅलरी योजने’ अंतर्गत खातेदाराच्या अपघाती मृत्यूप्रसंगी त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण संस्थेत शिपाई पदावर कार्यरत असलेले भगवान रामचंद्र गिरासे यांचे २०२० मध्ये अपघाती निधन झाले होते. त्यांच्या नवापूर शाखेतील पगार खात्याशी संलग्न असलेल्या या योजनेनुसार, त्यांचे वारसदारांना ४० लाख विमा रक्कम आणि १० लाखांची अतिरिक्त मदत, अशी एकूण ५० लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते कै. भगवान गिरासे यांच्या पत्नी योगेश्वरी गिरासे यांना धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर प्रवीणकुमार सिंग, नवापूर शाखेचे प्रबंधक मनीष परमार, नंदुरबार शाखेचे प्रबंधक सौरभ रैकवार तसेच गिरासे कुटुंबीय उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या ‘महा बँक सॅलरी योजने’चे विशेष कौतुक करत, अशा उपयुक्त योजनांचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांनी व पात्र खातेदारांनी घ्यावा, असे आवाहन केले. योगेश्वरी गिरासे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे आभार मानत, "या आर्थिक मदतीमुळे मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न सुटला आहे," असे सांगितले.
झोनल मॅनेजर प्रवीणकुमार सिंग यांनी खातेदारांनी आपल्याकडील खात्यांमध्ये नॉमिनी (वारस) चे नाव लावले आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन केले. तसेच नसेल, तर ते त्वरित जोडावे, असेही सांगितले.