

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्पाच्या 161 कोटी 12 लाख रुपयांच्या खर्चास सोमवार (दि.1) रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
नागन मध्यम प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतो. या प्रकल्पांतर्गत तापी खोरेतील नागन नदीवर 26.48 दलघमी साठवण क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. हे धरण भरडू गावाजवळ स्थित आहे. या प्रकल्पामुळे नवापूर तालुक्यातील 16 गावांतील 2,486 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार 161 कोटी 12 लाख रुपये खर्च करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.