

नंदूरबार - सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगलापाणी ५ किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन होऊन 13 महिने उलटले तरीही कामाचा खरोखर प्रारंभ झालेला नाही आणि रस्ताही अस्तित्वात आलेला नाही, म्हणून ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे बिरसा फायटर्स संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, रस्ता मंजूर नाही; मग फलक का लावला? असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. बिरसा फायटर्स संघटनेने शहादा बांधकाम विभागाचे अभियंता सह वरिष्ठ अधिकाऱ्यांना याविषयी निवेदन दिले आहे.
रस्ता नसल्याने दहा दिवसांपूर्वी केलापाणी येथील नवजात अर्भकाचा बाम्बूच्या झोळीतून दवाखान्यात नेतांना दुर्दैवी मृत्यू झाला. रस्ता नसल्यामुळे केलापाणी येथील नागरिकांना गाढवावरून माल वाहतूक करावी लागते. गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी व रूग्णांना बाम्बुलन्सच्या झोळीतून तब्बल 15 किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात न्यावे लागत आहे. येथील रहिवाशांची ही समस्या लक्षात घेऊन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना सोमवार (दि.3) रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनाची दखल घेऊन बांधकाम विभागाकडून या रस्त्याची पाहणी करण्यात आली. मात्र अभियंता केलापाणी येथे आल्यानंतर त्यांनी फलक लावून उद्घाटन केलेला रस्ता हा मंजूरच नसल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त होत रस्ता मंजूरच नव्हता तर आमदार, खासदार यांनी कसले उद्घाटन केले? असा सवाल उपस्थित केला. दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी माजी अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते आणि नंदूरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे फलक उद्घाटन करण्यात आले. फलकावर कामाचे ठेकेदार शितल बिल्डींग मटेरियल ॲन्ड कन्स्ट्रक्शन धडगांव असेही नमूद करण्यात आले आहे. कामाचे उद्घाटन होऊन एक वर्षाहून अधिक कालावधी झाला तरी रस्त्याचे व पुलाचे काम प्रत्यक्षात मात्र झालेलेच नाही.