

नंदुरबार : लग्नसराईमध्ये जेव्हा भेटवस्तू आणि दागदागिने दिले जातात, तेव्हा औरंगपुरा (ता.शहादा) येथील भिका लक्ष्मण पाटील यांनी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. आपल्या नातवाच्या लग्नाच्या ग्रहशांती कार्यक्रमानिमित्त, त्यांनी थेट सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस रुपये 31,111 इतकी रक्कम देऊन देशसेवेचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे. ही माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर डॉ. निलेश पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या विवाह सोहळ्याचे आयोजन 20 मे रोजी औरंगपुरा येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित उपस्थित होते. या खास प्रसंगी पाटील कुटुंबाने पारंपरिक भेटवस्तूंऐवजी थेट सैनिकांसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला.
“सैनिक जीवाची पर्वा न करता देशासाठी लढत असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना समाजातील प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे,” अशा भावनेतून पाटील कुटुंबाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या राष्ट्रप्रेमपूर्ण उपक्रमाची दखल घेत डॉ. निलेश पाटील यांनी भिका पाटील यांचा सत्कार करत त्यांना अधिकृत पावती सुपूर्त केली. “पाटील कुटुंबाचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आहे. देशप्रेम केवळ शब्दांपुरते न राहता कृतीतून व्यक्त होणे महत्त्वाचे आहे,” असेही ते म्हणाले.