

Nandurbar father and son died
नंदुरबार : घराच्या बांधकामाची पाहणी करून शेताकडे परतत असताना अपघात झाल्याने मोटरसायकल वरील तरुणाचा आणि त्याच्या सात वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कालुसिंग जामसिंग पावरा (वय ३२) आणि आर्यन कालुसिंग पावरा (वय ७ , रा. रेवानगर ता. तळोदा जि. नंदुरबार) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकलने कालुसिंग पावरा हे मुलगा आर्यन याच्या समवेत रेवानगर गावात तळोदा रोडवरील मेरसिंग जाला पावरा यांच्या शेताजवळ चालू असलेल्या घराचे बांधकाम पाहण्यासाठी आले होते. त्या ठिकाणाहून परत आपल्या शेतात जात असताना त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला.
ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी दोन्ही जण अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तथापि त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी रतन जामसिंग पावरा (रा. रेवानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक साळी अधिक तपास करीत आहेत.